काळीज पिळवटणारी घटना! मुलाचा विरह सहन होईना; व्याकुळ आई चितेच्या राखेतच झोपते
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 01:48 PM2021-05-12T13:48:57+5:302021-05-12T13:50:07+5:30
गुजरातच्या अमीरगड भागात एक आई मुलाच्या विरहानं व्याकुळ झाल्याचं चित्र समोर आलं आहे.
अमीरगड – देशात कोरोनाची दुसरी लाट पसरल्यापासून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अनेक ठिकाणी बेड्स, ऑक्सिजन उपलब्ध होत नाही म्हणून रस्त्यावर लोकांचे प्राण जात आहेत. स्मशानभूमीत जागा नाही, जागा असेल तर लाकडं नाही अशी विदारक परिस्थिती काही ठिकाणी समोर येत आहे. यातच आपल्या जवळची माणसं अचानक दगावत असल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसत आहे.
गुजरातच्या अमीरगड भागात एक आई मुलाच्या विरहानं व्याकुळ झाल्याचं काळीज पिळवटणारी घटना समोर आली आहे. जुनीरोह येथील रहिवासी मंगूबेन चौहान यांच्या मुलाचं ४ महिन्यापूर्वी एका दुर्दैवी अपघातात निधन झालं. मृत्यूच्या ४ महिन्यानंतरही आईला या दुखातून सावरता आलं नाही. ज्यावेळी आईला मुलाची आठवण येते तेव्हा ती मुलाला मुखाग्नी दिलेल्या ठिकाणी जाऊन राखेवर झोपते. गेल्या ४ महिन्यापासून असाच प्रकार अनेकदा घडत आहे. या आईची अशी अवस्था पाहून बघणाऱ्याच्या डोळ्यातही नकळत पाणी येते.
काहीजण या आईची समजूत काढण्याची जातात परंतु त्याचा काहीही उपयोग होत नाही. कधी कधी मंगूबेन अचानक घरातून गायब होतात तेव्हा कुटुंबीयांना ती मुलाला चिता दिलेल्या जागी गेल्याचं आढळून येते. तेव्हा ते तिला तिथून परत आणतात. या आईचा मुलगा महेशचा अपघातात मृत्यू झाला होता.
पित्यावर कोसळला दु:खाचा डोंगर
एका पित्याने कोरोनामुळे आपल्या दोन्ही मुलाला गमावलं आहे. एका मुलाचे अंत्यसंस्कार होत नाहीत. तोपर्यंत दुसऱ्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नोएडाच्या जलालपूर गावात ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अतार सिंह यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कोरोनामुळे आपल्या डोळ्यासमोर दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. अतार सिंह यांचा मुलगा पंकज सिंह यांच निधन झालं. त्यानंतर आपल्या काही नातेवाईकांसोबत त्याचा अंत्यविधी करण्यासाठी अतार सिंह गेले. ते स्मशानभूमीतून परत आल्यावर त्यांच्या दुसऱ्या मुलाचंही कोरोनामुळे निधन झाल्याचं समजलं.