अदानीप्रकरणी बोलताना विचार करून बोला; थेट शेअर बाजारावर परिणाम होताे; सेबीला नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 10:59 AM2023-02-11T10:59:06+5:302023-02-11T11:00:15+5:30
याचिकांमधून हिंडेनबर्ग अहवालावरून तपास करणे आणि गुंतवणूकदारांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच शाॅर्ट सेलिंग गुंतवणूकदारांविराेधात गुन्हे दाखल करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
नवी दिल्ली :गौतम अदानी-हिंडेनबर्ग खटल्यातील याचिकांवर सुप्रीम कोर्टात शुक्रवारी सुनावणी झाली. कोर्टाने म्हटले की, अदानी प्रकरणात जे काही युक्तिवाद केले जात आहेत, ते काळजीपूर्वक दिले पाहिजेत, कारण त्याचा थेट परिणाम शेअर बाजारावर होतो. चौकशी समिती नेमण्याचा विचार करण्याचे संकेतही न्यायालयाने दिले आहेत. आता याप्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे.
अदानीप्रकरणी गुंतवणूकदारांचे शाेषण केल्याप्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि शेअर बाजार नियंत्रक ‘सेबी’ला नाेटीस बजावली असून, बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत. ‘सेबी’चे अधिकार वाढविण्याबाबत एका समितीची स्थापना करण्याचा सल्ला न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ फेब्रुवारीला हाेणार आहे.
सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमाेर त्यावर सुनावणी झाली. त्यावेळी सेबीची बाजू मांडताना साॅलिसिटर जनरल यांनी सांगितले, की बाजार नियंत्रक आणि इतर संस्था आवश्यक कारवाई करीत आहेत.
याचिकांमधून हिंडेनबर्ग अहवालावरून तपास करणे आणि गुंतवणूकदारांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच शाॅर्ट सेलिंग गुंतवणूकदारांविराेधात गुन्हे दाखल करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
अमेरिकन कोर्टात देणार जोरदार लढा
अमेरिकेतील शाॅर्ट सेलर कंपनी हिंडेनबर्गच्या अहवालाचा माेठा फटका बसल्यानंतर उद्याेगपती गाैतम अदानी यांनी कायदेशीर लढ्यासाठी जाेरदार तयारी केली आहे. अदानी समूहाकडून अमेरिकेतील एक माेठी आणि महागडी कंपनी ‘वाॅचटेल’ या लाॅ फर्मची सेवा घेण्यात येणार आहे. वाॅचटेल ही कंपनी वादग्रस्त प्रकरणांत कायदेशीर लढाईसाठी ओळखली जाते. इलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदीच्या घोषणेपासून माघार घेतली होती. त्यावेळी ट्विटरने मस्क यांच्याविरोधातील न्यायालयीन लढ्यासाठी याच कंपनीची नियुक्ती केली होती.
मूडीजने दिला दणका...
अदानी समूहातील कंपन्यांचे मूल्य माेठ्या प्रमाणात घटल्यानंतर मूडीजने समूहातील चार कंपन्यांचे रेटिंग ‘स्थिर’वरून ‘नकारात्मक’ केले आहे. अदानी ग्रीन एनर्जी, अदानी ग्रीन एनर्जी रिस्ट्रिक्टेड समूह, अदानी ट्रान्समिशन स्टेपवन आणि अदानी इलेक्ट्रिसिटी, मुंबई या कंपन्यांचे रेटिंग बदलले आहे.