जेव्हा शिक्षिकाच सांगते... मार ’त्या’ विद्यार्थ्याला थोबाडीत! देशभरात संताप; विरोधकांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2023 02:02 AM2023-08-27T02:02:34+5:302023-08-27T02:02:46+5:30

माहितीनुसार, गुरुवारी खुब्बारपूर गावातील शाळेत हा प्रकार घडला. त्रिप्ता त्यागी या शिक्षिकेने सदर विद्यार्थ्याला शिक्षा म्हणून त्याच्याच वर्गमित्रांना कानफडात मारण्यास सांगितले.

When the teacher says... slap 'that' student! Outrage across the country; Opponents attack | जेव्हा शिक्षिकाच सांगते... मार ’त्या’ विद्यार्थ्याला थोबाडीत! देशभरात संताप; विरोधकांचा हल्लाबोल

जेव्हा शिक्षिकाच सांगते... मार ’त्या’ विद्यार्थ्याला थोबाडीत! देशभरात संताप; विरोधकांचा हल्लाबोल

googlenewsNext

मुझफ्फरनगर : उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमधील एका शाळेतील धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला असून, वादाला तोंड फुटले आहे. व्हिडीओमध्ये, एक शिक्षिका, एका विद्यार्थ्याला वर्गात सर्वांसमोर उभे करून त्याच्याच वर्गमित्रांना त्याच्या थोबाडीत मारायला सांगते. यावेळी ती विशिष्ट धर्माला उद्देशूनही आक्षेपार्ह विधान करते. 

माहितीनुसार, गुरुवारी खुब्बारपूर गावातील शाळेत हा प्रकार घडला. त्रिप्ता त्यागी या शिक्षिकेने सदर विद्यार्थ्याला शिक्षा म्हणून त्याच्याच वर्गमित्रांना कानफडात मारण्यास सांगितले. व्हिडीओनुसार, ती एकामागून एक मुलांना बोलावून त्याला मारण्यास सांगते. एक मुलगा थोबाडीत मारून जातो तेव्हा ती, ‘काय मारतोय, जोरात मारना’ असं सांगते. रडणाऱ्या विद्यार्थ्याला बघून तिला अजिबात दया येत नाही, उलट ‘चला मारण्याचं आणखी कोण बाकी आहे. आता पाठीवर मारा. तोंडावर मारल्याने त्याचे गाल लाल होत आहेत’, असे म्हणते. 
पीडित विद्यार्थ्याच्या पालकांनी सुरुवातीला तक्रार करण्यास नकार दिला होता, पण सोशल मीडियावर संताप वाढत गेल्यावर त्यांनी शनिवारी शिक्षिकेविरुद्ध एफआयआर दाखल केला.

ज्येष्ठ पटकथा लेखक जावेद अख्तर, अभिनेत्री रेणुका शहाणे आणि अभिनेते प्रकाश राज अशा सेलिब्रिटिंनीही शिक्षिकेवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. शिक्षिकेला तत्काळ निलंबित केले जाईल, अशी आशा असल्याची पोस्ट अख्तर यांनी केली.

विरोधकांचा हल्लाबोल 
‘हे भाजपने पसरवलेले तेच पेट्रोल आहे, ज्याने भारताच्या कानाकोपऱ्यात आग लावली आहे’, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली.
“या घटनेला आदित्यनाथ आणि त्यांचे द्वेषपूर्ण विचार जबाबदार आहेत”, असे एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी म्हणाले. तर, याला भाजप-आरएसएसचे “द्वेषाचे राजकारण” जबाबदार आहे, ज्याने देशाला अशा स्थितीत आणले, अशी टीका समाजवादी पक्षाने केली.  

मी दिव्यांग म्हणून...
तो गृहपाठ करत नव्हता. मी दिव्यांग आहे, उठता येत नसल्यामुळे २-३ विद्यार्थ्यांना त्याला मारण्यास सांगितले. तणाव वाढविण्यासाठी व्हायरल व्हिडीओसह छेडछाड केली असून, माझा तसा उद्देश नव्हता. तरी मी चूक केली आहे म्हणून मी हात जोडून माफी मागते.
- त्रिप्ता त्यागी, 
आरोपी शिक्षिका

Web Title: When the teacher says... slap 'that' student! Outrage across the country; Opponents attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.