...अन् विशाल ददलानीला मागावी लागली होती मुनी तरुण सागर यांची माफी!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2018 02:04 PM2018-09-01T14:04:01+5:302018-09-01T14:04:34+5:30
तरुण सागर यांच्या हरयाणा विधानसभेतील भाषणावर केली होती टीका
नवी दिल्ली: जैन मुनी तरुण सागर यांचं आज मध्यरात्री निधन झालं. वयाच्या 51 व्या वर्षी त्यांनी दिल्लीत अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अतिशय नाजूक होती. त्यांची प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी त्यांच्या अनुयायांकडून प्रार्थना केल्या जात होत्या. मात्र ते उपचारांना प्रतिसाद देत नव्हते. आज मध्यरात्री तीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
तरुण सागर यांच्या अनुयायांची संख्या लाखोंच्या घरात आहे. ते त्यांच्या कडव्या विचारासांठी आणि परखड बोलण्यासाठी ओळखले जायचे. दोन वर्षांपूर्वी हरयाणाचे शिक्षणमंत्री रामविलास शर्मा यांनी तरुण सागर यांना विधानसभेत आमंत्रित केलं होतं. त्यावेळी तरुण सागर यांनी विधानसभेला संबोधित केलं होतं. जैन परंपरेनुसार, तरुण सागर कपड्यांशिवाय हरयाणाच्या विधानसभेत पोहोचले. यावरुन संगीतकार विशाल ददलानीनं ट्विटरवर नाराजी व्यक्त केली होती. 'जर तुम्ही अशा व्यक्तींना निवडून देत असाल, तर यासाठी तुम्हीच जबाबदार आहात,' असं ददलानीनं ट्विटमध्ये म्हटलं होतं. नो अच्छे दिन जस्ट नो कच्छे दिन, असंही त्यानं ट्विटमध्ये म्हटलं होतं.
विशाल ददलानीच्या या ट्विटनंतर अनेकांनी त्याच्यावर टीका केली. यानंतर ददलानीनं तरुण सागर यांची भेट घेतली आणि कान धरुन त्यांची माफी मागितली. जैन धर्माच्या परंपरेनुसार अशाप्रकारे माफी मागितली जाते. आपल्या कडव्या प्रवचनांसाठी ओळखल्या जाणाऱ्या तरुण सागर यांचा जन्म 1967 मध्ये मध्य प्रदेशच्या दमोह जिल्ह्यात झाला. त्यांचं मूळ नाव पवन कुमार जैन असं होतं. जैन मुनी होण्यासाठी त्यांनी 13 व्या वर्षी घरी सोडलं आणि 8 मार्च 1981 रोजी दिक्षा घेतली.