‘आम्ही एकत्र आलो की, छापे सुरू होतात’; देशभरात ईडीच्या कारवाया, विरोधकांकडून संतप्त प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 06:09 AM2023-03-12T06:09:57+5:302023-03-12T06:11:30+5:30

ईडीच्या चौकशीवरून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

when we come together the raids begin ed actions across the country angry reaction from opponents | ‘आम्ही एकत्र आलो की, छापे सुरू होतात’; देशभरात ईडीच्या कारवाया, विरोधकांकडून संतप्त प्रतिक्रिया

‘आम्ही एकत्र आलो की, छापे सुरू होतात’; देशभरात ईडीच्या कारवाया, विरोधकांकडून संतप्त प्रतिक्रिया

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : ‘लँड फॉर जॉब’ प्रकरणात बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना सीबीआयने समन्स बजावले आहे. त्यावर, आम्ही एकत्र आलो की, छापे सुरू होतात. २०१७ मध्येही असेच झाले होते. आता पाच वर्षांनंतर पुन्हा तेच सुरू झाले आहे, असे टीकास्त्र बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सोडले आहे. दुसरीकडे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) भारत राष्ट्र समितीच्या नेत्या व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. कविता यांचीही चौकशी केली. ईडीच्या चौकशीवरून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

सीबीआयने तेजस्वी यांचे माता-पिता आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आणि त्यांची पत्नी राबडी देवी यांची अलीकडेच दिल्लीत चौकशी केली आहे. तेजस्वी यादव यांना दि. ४ मार्च रोजीच सीबीआयने चौकशीसाठी बोलावले होते. तथापि, ते सीबीआयसमोर हजर झाले नव्हते. त्यामुळे त्यांना नवीन समन्स बजावण्यात आले. मात्र, त्यांनी वाढीव मुदत मागितली आहे.

के. कविता यांची दिल्ली अबकारी धोरणातील कथित अनियमिततांशी संबंधित प्रकरणात शनिवारी दिल्लीतील ईडीच्या कार्यालयात ९ तास चौकशी झाली. हैदराबादेतील व्यावसायिक अरुण रामचंद्रन पिल्लई यांच्यासमोर बसवून त्यांची चौकशी करण्यासाठी ईडीने त्यांना बोलावले होते.

माझे मनोधैर्य तोडू शकत नाहीत : सिसोदिया

साहेब, तुरुंगात टाकून तुम्ही मला त्रास देऊ शकता; पण तुम्ही माझे मनोधैर्य तोडू शकत नाही, असा संदेश दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी तिहार तुरुंगातून पाठविला आहे.

आरएसएस-भाजपविरुद्ध लढत राहणार : लालू

लालूप्रसाद यादव यांनी सांगितले की, आरएसएस आणि भाजप यांच्याविरुद्ध माझी वैचारिक लढाई सुरू आहे आणि सुरूच राहील. मी कधीही गुडघे टेकले नाहीत. माझा परिवार आणि पक्ष यातील कोणीही व्यक्ती तुमच्यापुढे झुकणार नाही. 

ईडीचे अधिकारी महिलांना सतावतात : खरगे

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले की, मोदी यांनी मागील १४ तासांपासून बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या घरी ईडी थांबवून ठेवली आहे. त्यांची गर्भवती पत्नी आणि बहिणींना सतावले जात आहे. लालूप्रसाद यादव ज्येष्ठ आहेत, आजारी आहेत. तरीही मोदी सरकार त्यांच्याबद्दल मानवता दाखवायला तयार नाही.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: when we come together the raids begin ed actions across the country angry reaction from opponents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.