सुनीता विल्यम्स अंतराळातून परत कधी येणार? ISRO प्रमुख एस सोमनाथ यांनी दिली मोठी अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 12:30 PM2024-06-30T12:30:51+5:302024-06-30T12:31:25+5:30
Sunita Williams : काही दिवसापूर्वी सुनीता विल्यम्स आणि बुश विल्मोर तिसऱ्यांदा अवकाशात गेले आहेत. दरम्यान, आता त्यांच्या परतीच्या प्रवासात तांत्रिक अडचणी आल्या आहेत. याबाबत आता इस्त्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी नवीन अपडेट दिली आहे.
Sunita Williams : भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स अन्य एका सहकाऱ्यासह तिसऱ्यांदा अवकाशात रवाना झाल्या. यासह या दोघांनी बोईंग कंपनीच्या स्टारलाइनर अंतराळयानात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले सदस्य बनून इतिहास रचला.पण, आता याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. सुनीता विल्यम्स यांच्या परतीच्या प्रवासात तांत्रिक अडचणी आल्या आहेत. यामुळे परत येण्यास विलंब होत आहे. आता इस्त्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी याबाबत अपडेट दिली आहे. 'सुनीता विल्यम्स यांच्या परतण्याचा चिंतेचा विषय नसावा, लोकांना दीर्घकाळ राहण्यासाठी स्पेस स्टेशन हे सुरक्षित ठिकाण आहे, अशी प्रतिक्रिया एस सोमनाथ यांनी दिली.
नीट : गुजरातमध्ये छापासत्र! पेपरफुटीप्रकरणी चार जिल्ह्यांत सात ठिकाणी कारवाई
इस्त्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी एनडीटीव्हीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी सुनीता विल्यम्स यांच्याबाबतीत अपडेट दिली. इस्रो प्रमुख एस सोमनाथ म्हणाले, "हे फक्त सुनीता विल्यम्स किंवा इतर कोणत्याही अंतराळवीरांबद्दल नाही. त्यांना एक ना एक दिवस परत यावे लागेल. संपूर्ण मुद्दा बोईंग स्टारलाइनर नावाच्या नवीन क्रू मॉड्यूलच्या चाचणीचा आहे. ते सुरक्षितपणे परत येण्याच्या क्षमतेबद्दल आहे. ISS हे लोकांसाठी दीर्घकाळ राहण्यासाठी सुरक्षित ठिकाण आहे.
नासाचे दोन अंतराळवीर बुश विल्मोर आणि सुनीता विल्यम्स १४ जून रोजी परतणार होते. मात्र, बोईंगच्या स्टारलाइनर यानाला अनेक तांत्रिक अडचणी आल्या, त्यामुळे त्यांच्या परतीला अनेकवेळा विलंब झाला. अंतराळवीरांच्या परत येण्याची चिंता करण्याऐवजी नवीन क्रू मॉड्युल आणि अवकाशात प्रवास करण्याच्या क्षमतेची चाचणी करण्यावर विचार केला पाहिजे यावर सोमनाथ यांनी भर दिला. नवीन अंतराळयानाचे पहिले उड्डाण करण्याच्या धाडसाबद्दल त्यांनी विल्यम्स यांचेही कौतुक केले.
एस सोमनाथ म्हणाले, "आम्हा सर्वांना त्यांचा अभिमान आहे. त्यांच्या नावावर अनेक मोहिमा आहेत. नवीन अंतराळ यानाच्या पहिल्या उड्डाणावर प्रवास करणे ही एक धाडसी गोष्ट आहे. ते स्वत: डिझाइन टीमचा भाग आहे आणि त्यांच्या अनुभवातून मिळालेल्या इनपुटचा वापर केला आहे.
नासाचे दोन अंतराळवीर ISS वर अधिक काळ राहू शकतात. नासाने शुक्रवारी अंतराळवीरांच्या परतीची कोणतीही तारीख दिली नाही आणि ते सुरक्षित असल्याचे सांगितले.