तुमच्यामुळे आमच्या अस्तित्वाला धोका; अशी भीती जोवर असेल, तोवर आत्मीयता निर्माण होणार नाही - मोहन भागवत
By श्रीकृष्ण अंकुश | Published: January 1, 2021 09:17 PM2021-01-01T21:17:10+5:302021-01-01T21:19:31+5:30
हिंदू असेल, तर तो देशभक्त असायलाच हवा. कारण ते त्याच्या मुळातच आहे. तो झोपलेला असू शकतो, त्याला उभे करावे लागेल. मात्र, कुणीही हिंदू भारत विरोधी असू शकत नाही.
नवी दिल्ली - पूजा पद्धती, कर्मकांड कुठलेही असोत, मात्र, सर्वांनी एकत्रितपणे रहायला हवे. फरक म्हणजे फाटाफूट नव्हे (difference doesn't mean separatism). जोवर मनात ही भीती असेल, की तुमच्या असल्याने माझ्या अस्तित्वाला धोका आहे आणि आपल्याला माझ्या असल्याने आपल्या अस्तित्वाचा धोका वाटेल, तोवर सौदे तर होऊ शकतात, पण आत्मीयता निर्माण होऊ शकत नाही, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ते 'मेकिंग ऑफ अ हिंदू पेट्रियॉट- बॅकग्राउंड ऑफ गांधीजीज हिंद स्वराज' नावाच्या इंग्रजी पुस्तकाच्या विमोचन कार्यक्रमात बोलत होते.
भागवत म्हणाले, वेगळे असल्याचा अर्थ असा नाही, की आपण एका समाजाचे अथवा एक धरतीचे पुत्र बनून राहू शकत नाही. एवढेच नाही, तर पुस्तकाचे नाव आणि माझ्या हस्ते त्याचे विमोचन, याचा असाही अर्थ काढला जाऊ शकतो, की हा गांधीजींना आपल्या सोयीनुसार परिभाषित करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, महापुरुषांना कुणीही आपल्या सोयीनुसार परिभाषित करू शकत नाही. हे पुस्तक व्यापक संशोधनावर आधारलेले आहे आणि ज्यांचे मत यापेक्षा वेगळे असेल, तेदेखील संशोधन करून लिहू शकतात, असेही भागवत म्हणाले,
गांधीजी म्हणाले होते, की माझी देशभक्ती माझ्या धर्मातून येते. मी माझा धर्म समजूनच एक चांगला देशभक्त बनेन आणि लोकांनाही असेच करायला सांगेन. एवढेच नाही, तर स्वराज्य समजून घ्यायचे असेल, तर स्वधर्माला समजून घ्यावे लागेल, असेही गांधीजी म्हणाले होते, असे भागवत म्हणाले.
स्वधर्म आणि देशभक्तीचा उल्लेख करत सरसंघचालक भागवत म्हणाले, हिंदू असेल, तर तो देशभक्त असायलाच हवा. कारण ते त्याच्या मुळातच आहे. तो झोपलेला असू शकतो, त्याला उभे करावे लागेल. मात्र, कुणीही हिंदू भारत विरोधी असू शकत नाही.