"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 08:42 PM2024-11-12T20:42:18+5:302024-11-12T20:43:23+5:30
Gajendra Singh Shekhawat Attack On Congress: इतिहासात जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला. एवढेच नाही, तर काँग्रेस फोडाफोडीचे राजकारण करत असल्याचा आरोपही गजेंद्रसिंह शेखावत यांनी केला आहे.
'बटेंगे तो कटेंगे' या घोषणेसंदर्भात केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी मंगळवारी भाष्य केले आहे. इतिहासात जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला. एवढेच नाही, तर काँग्रेस फोडाफोडीचे राजकारण करत असल्याचा आरोपही गजेंद्रसिंह शेखावत यांनी केला आहे. ते एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते.
शेखावत म्हणाले, "काँग्रेसने नेहमीच विभाजनाचे राजकारण केले आहे. त्यांनी धर्म, संपत्ती, जात आणि भाषेच्या आधारे देशाचे विभाजन केले आहे. आता ते लोकांमध्ये फूट पाडून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते आता लोकांमध्ये त्यांच्या कपड्यांचा रंगावरून फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. भगवा आमच्या सन्मानाचे प्रतिक आहे. हा आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाही, तर श्रद्धेचा विषय आहे."
"आमच्याकडे कथांमध्ये लिहिलेले आहे, एकतेतच शक्ती आहे. आजपर्यंत जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा तो भाग देशापासून वेगळा झाला आहे. मध्य आशियातील पर्शियापासून ते अफगाणिस्तान आणि नेपाळपर्यंत, ज्या पद्धतीने भारतापासून वेगळे झाले, ते फुटीमुळेच झाले. हे इतिहासाच्या पुस्तकांमध्ये लिहिलेले आहे," असेही शेखावत म्हणाले.
काँग्रेस म्हणते प्रक्षोभक घोषणा -
याचवेळी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) भडकाऊ भाषणे, फुटीरतावादी घोषणांद्वारे जनतेची दिशाभूल करण्याचा आणि त्यांच्या पक्षाबद्दल चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप केला आहे. खर्गे म्हणाले, भाजप फूट पाडण्यात गुंतली आहे.
ते म्हणाले, "एकीकडे योगी म्हणतात, ‘बटेंगे तो कटेंगे’, मोदी म्हणतात ‘एक हैं तो सेफ हैं.’ माझ्या दोन्ही नेत्यांना आग्रह आहे की, कुणाची घोषणा वापरायची, यावर त्यांनी एकमत करावे, योगींचा की मोदींचा"