ऐन निवडणूक काळात 2000 च्या नोटा गेल्या कुठे? आरबीआयसह बँकाही शोधात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 03:51 PM2019-05-09T15:51:00+5:302019-05-09T15:59:12+5:30
लोकसभा निवडणुकीत काळेधन रोखण्याचा दावा निवडणूक आयोगाकडून केला जात आहे. मात्र, बाजारात 2000 च्या नोटाच दिसायच्या बंद झाल्या आहेत.
नोटाबंदीनंतर केंद्र सरकारने 500, 1000 च्या नोटा बंद केल्या आणि 2000 च्या नोटा बाजारात आणल्या होत्या. मध्यंतरीच्या काळात या 2000 च्या नोटा बंद होणार असल्याची अफवा उठली होती. कारण त्या बाजारात चलनातून हळूहळू कमी होत होत्या. तेव्हा खुद्द रिझर्व्ह बँकेनेच या नोटा बंद होणार नसल्याचे सांगितले होते. आता निवडणुक काळात या नोटाच चलनातून गायब झाल्या आहेत. याचे गौडबंगाल काय, या विचारात आरबीआय आणि बँका पडल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीत काळेधन रोखण्याचा दावा निवडणूक आयोगाकडून केला जात आहे. मात्र, बाजारात 2000 च्या नोटाच दिसायच्या बंद झाल्या आहेत. यामुळे या नोटा मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवण्यात आल्या आहेत. रिझर्व्ह बँकेनुसार जवळपास 50 टक्के नोटा बाजारात खेळत्या आहेत. तर बँकांमध्ये केवळ 500 आणि 200 रुपयांच्याच नोटांचे येणे-जाणे सुरु आहे. यामुळे 2000 च्या नोटांचा काळाबाजार तर होत नाही ना अशी शंका येऊ लागली आहे.
कानपूरच्या अनेक करन्सी चेस्टमध्ये 2000 च्या बोटा नावालाच उरल्या आहेत. या नोटा ना रिझर्व्ह बँकेकडे आहेत, ना ही बँकांकडे आहेत. लोकसभा निवडणुकीच्या एक वर्ष आधीपासूनच या नोटांची जमाखोरी सुरुझाल्याचे सांगण्यात येत आहे. याचा परिणाम बँकांच्या व्यवहारावर होताना दिसत आहे.
कानपूरमधील करन्सी चेस्टचा ताळेबंद पाहिल्यास हा प्रकार खटकतो. 2000 रुपयांच्या नोटांच्या एकूण संख्येच्या 20 टक्केच नोटा शिल्लक आहेत. तर रिझर्व्ह बँकेकडून जारी केलेल्या नोटांपैकी 50 टक्के हिस्सा बाजारात आहे.
बँकेच्या सुत्रांनुसार 2000 रुपयाच्या नोटा बँक, बाजार आणि एटीएममधून दररोज कमी होत आहेत. त्याजागी 500 आणि 200 रुपयांच्या नोटा मोठ्याप्रमाणावर वापरल्या जात आहेत. 2000 च्या 80 टक्के नोटा लोकांच्या तिजोऱ्यांमध्ये ठेवलेल्या आहेत.
या नोटांना कथितरित्या मोठमोठ्या व्यवहारांमध्ये वापरले जात आहे. कानपूरमध्ये निवडणूक काळात पकडली गेलेली 4 कोटींची रक्कम या 2000 च्या नोटांचीच होती. जी पकडण्यात आली नाही ती काळ्याधनाच्या रुपात वापरली जात आहे.
2000 च्या नोटा गायब होण्याचे प्रमाण
नोटाबंदीनंतर सहा महिन्यांनी म्हणजेच एप्रिल ते जून 2017 मध्ये बँकांमध्ये एकूण रोकडीमध्ये येणाऱ्या 2000 च्या नोटांची संख्या 35 ते 40 टक्के होती. नोव्हेंबर 2017 मध्ये ही संख्या 20 ते 25 टक्के झाली. ही परिस्थिती अशीच सुरु होती. मार्च 2018 मध्ये 18 ते 20 टक्क्यावर आल्यानंतर शेवटच्या महिन्यांमध्ये ती 4 ते 5 टक्क्यांवर आली होती. आता तर अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच नोटा बँकांमध्ये येत आहेत.