कुठे गेली आता ५६ इंचाची छाती?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2015 12:12 AM2015-06-15T00:12:32+5:302015-06-15T00:12:32+5:30
जम्मू-काश्मिरात पाकिस्तान आणि अतिरेकी संघटना इसिसचे झेंडे फडकवण्यात आल्याच्या घटनेवरून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार
पाटणा : जम्मू-काश्मिरात पाकिस्तान आणि अतिरेकी संघटना इसिसचे झेंडे फडकवण्यात आल्याच्या घटनेवरून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मोदी सरकारला जोरदार लक्ष्य केले. जम्मू-काश्मिरात पाकिस्तान आणि इसिसचे झेंडे फडकवले जात आहेत. कुठे गेली ५६ इंचाची छाती? असा खोचक सवाल त्यांनी यानिमित्ताने केला. त्यांचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे होता.
गतवर्षी जानेवारीत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असताना, गुजरात बनवण्यासाठी ५६ इंचाची छाती हवी, असे नरेंद्र मोदी म्हणाले होते. हाच धागा पकडून शनिवारी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरे देताना नितीश यांनी मोदी सरकारवर जोरदार तोफ डागली.
जम्मू-काश्मिरात इसिससारखी जहाल अतिरेकी संघटना आणि पाकिस्तानचे झेंडे फडकवले जाणे चिंताजनक आहे. ५६ इंचाची छाती असल्याचा दावा करणारी आणि दिल्लीत सत्तेत असणारी व्यक्ती हे झेंडे फडकविले जात असताना कुठे होती? कुठे गेली ५६ इंचाची छाती? असे ते म्हणाले.
जितनराम मांझी यांनी भाजपशी हातमिळवणी केल्याच्या मुद्यावर छेडले असता नितीश यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. (वृत्तसंस्था)