चंद्र आणि सूर्यानंतर कुठे? इस्रो प्रमुखांनी सांगितला पुढचा प्लॅन; सूर्यमालेची रहस्यं उलगडणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 12:21 AM2023-09-27T00:21:31+5:302023-09-27T00:23:34+5:30
यासंदर्भात खुद्द इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी मंगळवारी माहिती दिली...
इस्रोचीचंद्रयान-3 मोहीम यशस्वी ठरली. आपण सूर्याकडेही झेप घेतली. यानंतर आता पुढचा प्लॅन काय? यासंदर्भात खुद्द इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी मंगळवारी माहिती दिली. ते म्हणाले, ISRO ने अशा ताऱ्यांचे रहस्य उलगडण्याची योजना आखली आहे, ज्यांवर वातावरण असल्याचे बोलले जाते अथवा जे तारे सूर्यमालेच्या बाहेर आहेत.
इंडियन नॅशनल सायन्स अकादमी (INSA) च्या कार्यक्रमात व्याख्यान देताना सोमनाथ म्हणाले, एजन्सी शुक्र ग्रहाच्या (व्हिनस) अध्ययनासाठी एक मिशनची योजना आखत आहे. याशिवाय अवकाशातील हवामान आणि त्याचा पृथ्वीवर होणारा परिणाम याचा अभ्यास करण्यासाठी दोन उपग्रह पाठवण्याचीही योजना आहे.
अनेक रहस्यं उलगडतील -
इस्रो प्रमुख म्हणाले, एक्सपोसॅट अथवा एक्स-रे पोलरीमीटर सॅटॅलाइट या वर्षाच्या डिसेंबर महिन्यात प्रक्षेपणासाठी तयार आहे. हे सॅटॅलाइट नामशेष होण्याच्या प्रक्रियेतून जात असलेल्या ताऱ्यांच्या अध्यनासाठी आहे. एवढेच नाही, तर आम्ही एक्सोवर्ल्ड्स (Exoworlds) नावाच्या उपग्रहाच्या संकल्पनेवरही विचार करत आहोत, जो आपल्या सौरमालेबाहेरील ग्रह आणि इतर ताऱ्यांभोवती फिरणाऱ्या ग्रहांचे अध्ययन करेल, असेही सोमनाथ यांनी सांगितले.
मंगळावरही यान उतरवण्याचा विचार -
सोमनाथ म्हणाले, सूर्यमालेच्या बाहेर 5,000 हून अधिक ज्ञात ग्रह आहेत. यांपैकी किमान 100 ग्रहांवर पर्यावरण असल्याचे मानले जाते. याच बरोबर, मंगळावरही यान उतरवण्याचा विचार सुरू आहे. असेही सोमनाथ यांनी यावेळी सांगितले.