सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ता हमारा... मोहम्मद सरताझचा धीरोदात्त संदेश
By admin | Published: October 5, 2015 02:19 PM2015-10-05T14:19:45+5:302015-10-05T14:19:45+5:30
सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा, मजहब नही सिखाता, आपस में बैर रखना... हे शब्द आहेत मोहम्मद सरताज याचे, ज्याच्या वडिलांची घरात बीफ बाळगल्याच्या अफवेवरून हत्या करण्यात आली
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा, मजहब नही सिखाता, आपस में बैर रखना... हे शब्द आहेत मोहम्मद सरताज याचे, ज्याच्या वडिलांची घरात बीफ बाळगल्याच्या अफवेवरून हत्या करण्यात आली तर भाऊ रुग्णालयात जखमी अवस्थेत आहे. सरताझ हा उत्तर प्रदेशातल्या दादरी जिल्ह्यातील बिसखेडा गावातल्या मोहम्मद अखलाख यांचा मुलगा.
कुणीतरी अफवा उठवली की अखलाख यांच्या घरात गाईचे मांस आहे, आणि बेधुंद जमावाने त्यांच्या घरावर हल्ला चढवला, ज्यामध्ये अखलाख यांना प्राण गमवावे लागले. या प्रसंगाचा राजकीय फायद्यासाठी वापर करून घेण्याचा प्रयत्न होत असल्याचे अनेकांनी निदर्शनास आणले. काही जणांच्या सांगण्यानुसार दोन धर्मीयांमध्ये दुहीची बीजं पेरण्यासाठी अशा प्रसंगांचा वापर करण्यात येण्याची शक्यता आहे.
मात्र, या प्रसंगाला बळी पडलेल्या कुटुंबातील व एअर फोर्समध्ये नोकरीला असलेल्या मोहम्मद सरताझने मात्र कुठलीही कटुता अथवा बदल्याची भावना व्यक्त न करता NDTV वरील एका कार्यक्रमात बोलताना राजकीय नेत्यांना उद्देशून सारे जहाँ से चे बोल ऐकवले.
बहुतेक भारतीय चांगले आहेत, पण काही हातावर मोजण्याएवढे वाईट आहेत असं त्यानं सांगितलं. हा प्रकार घडला त्यावेळी सरताझ चेन्नईमध्ये ड्युटीवर होता. मी देशासाठी एअरफोर्समध्ये काम करतो आणि राष्ट्रीय वृत्तीचा असून घडला प्रकार पचवणं जड असल्याचंही त्यानं सांगितलं.
लाठ्या काठ्या व विटा घेऊन घरावर चाल करून आलेल्यांमध्ये अनेक दशके ओळखणा-या शेजा-यांचा व मित्रांचा समावेश होता. यातील अनेकांनी तर ईद आमच्यासोबत साजरी केली, त्यामुळे असं काही होईल असं कधी वाटलं पण नव्हतं असंही त्यानं सांगितलं.
काही मोजक्या लोकांमुळे वातावरण बिघडत असून लोकांनी शांतता राखावी आणि सामाजिक बंधुत्वभाव ठेवावा असं आवाहन सरताझने केलं आहे.