कुठे आहे बेटी बचाव?; भरसभेत त्यानं पंतप्रधान मोदींना सवाल केला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 10:21 PM2019-10-15T22:21:13+5:302019-10-15T22:40:58+5:30
भाषण करणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या दिशेनं भिरकावले कागद
थानेसर: पंतप्रधान नरेंद्र मोदीहरयाणात जनसभेला संबोधित करताना एका व्यक्तीनं जोरदार घोषणाबाजी केली. या व्यक्तीनं मोदींच्या 'बेटी बचाव, बेटी पढाव'च्या घोषणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मोदींच्या दिशेनं काही कागदपत्रं भिरकावली. कुठे आहे बेटी बचाव, बेटी पढाव, असा सवाल विचारत जवळपास 5 मिनिटं त्या व्यक्तीनं आरडाओरडा केला. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.
पंतप्रधानांसमोर आरडाओरडा करुन त्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला साध्या वेशातील पोलिसांनी ताब्यात घेतलं. माध्यमांच्या प्रतिनिधींपासून काही अंतरावर हा प्रकार घडला. हा प्रकार पाहण्यासाठी सभेला उपस्थित असणारे अनेक जण उभे राहिले. यावेळी पंतप्रधान मोदींचं भाषण सुरूच होतं. या व्यक्तीनं मोदींच्या दिशेनं फेकलेल्या कागदपत्रांमधून त्याचं नाव अशोक कुमार असल्याची माहिती समोर आली. अशोक कुमार जगधरीतील गुलाब नगरचा रहिवासी आहे.
अशोक कुमार यांनी पंतप्रधान मोदींच्या दिशेनं भिरकावलेल्या कागदपत्रांमधून यमुना नगरमधील एका शाळेत आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची व्यथा मांडली आहे. संबंधित मुलीवर तिच्याच शाळेतील शिक्षकानं 26 ऑगस्टला लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप मोदींच्या दिशेनं फेकण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांची भेट घेतली. मात्र त्यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
पीडित मुलीच्या पालकांनी या प्रकरणी तडजोड करण्यास नकार दिल्यावर मुलीला मारहाण करण्यात आली. याशिवाय तिला आणि तिच्या पालकांना जातीयवादी शिवीगाळ करण्यात आली. त्यानंतर पीडित कुटुंबानं पोलिसांकडे धाव घेतली. मात्र त्यांनी या प्रकरणात कोणतीही कारवाई केली नाही. याउलट पीडित कुटुंबाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला.