कुठे छत्रपती शिवाजी महाराज नी कुठे गांधी घराणे - पंतप्रधान मोदींचा नाव न घेता वार
By admin | Published: June 13, 2016 06:56 PM2016-06-13T18:56:37+5:302016-06-13T18:56:37+5:30
भारतीय जनता पार्टीची प्रतिमा जनमानसात चांगली राखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कार्यकर्त्यांना 7 पॉइंट अजेंडा दिला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
अलाहाबाद, दि. 13 - भारतीय जनता पार्टीची प्रतिमा जनमानसात चांगली राखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कार्यकर्त्यांना 7 पॉइंट अजेंडा दिला आहे. केवळ घोषणाबाजी करून शांत न बसता या सात मंत्रांचे पालन करावे असे आवाहन मोदींनी केले आहे. विशेष म्हणजे, मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं आणि त्यांनी सत्ता असून सत्तेची फळं चाखली नाहीत असा दाखला दिला. त्याचबरोबर महाराजांच्या वर्तणुकीच्या विरोधाभासाचं उदाहरण देताना मोदींनी काहीजण सत्ताधीश नसूनही सत्तेची फळं चाखतात असा नाव न घेता सोनिया गांधींवर हल्ला चढवला. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या समारोपप्रसंगी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
केवळ घोषणाबाजी करून भागणार नाही
पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी धार्मिकदृष्ट्या संवेदनशील भागातून हिंदू स्थलांतर करत असल्याचा दाखला दिला, मात्र मोदींनी यासंदर्भात भाष्य टाळताना समाजाच्या भल्यासाठी सत्तेचा वापर करा असा सल्ला दिल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.
आपण इतिहास घडताना बघत आहोत आणि अनेक वर्षांच्या मेहनतीची फळं विविध राज्यांमध्ये सत्ता स्थापन मिळवत आहोत असं मोदी म्हणाले. मात्र, ही सत्ता मिळाल्यामुळे विचलित न होता, समाजाच्या भल्यासाठी सत्ता राबवायला हवी असा सल्ला त्यांनी दिला. लोक केवळ घोषणांनी तृप्त होत नाहीत, त्यांना राष्ट्र कसे समर्थ होईल याची चिंता असते असे मोदी म्हणाले.
7 पॉइंट अजेंडा
मोदींनी भाजपा कार्यकर्त्यांना 7 पॉइंट अजेंडा दिला असून मंत्रांप्रमाणे त्याचे पालन करावे असे आवाहन केले आहे. हा अजेंडा आहे...
- सेवाभाव
- संतुलन
- संयम
- समन्वय
- सकारात्मकता
- संवेदनशीलता
आणि
- संवाद