भाजपा अन् बीजेडीत कुठे बिनसले? इगो आड आला की जागा? 'महाराष्ट्रासारखीच' इनसाईड स्टोरी...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 09:50 AM2024-03-23T09:50:30+5:302024-03-23T09:51:15+5:30
BJP-BJD alliance talks failed in Odisha: भाजपा-बीजेडी पैकी पहिली घोषणा कोणी केली याला महत्व नसून ही युती तुटण्यामागची कारणे महत्वाची मानली जात आहेत.
एकीकडे इंडिया आघाडीतील पक्ष आपापले इगो, महत्वाकांक्षांमुळे फुटले असताना तिकडे एनडीएमध्ये देखील ओडिशामध्ये युती तुटली आहे. भाजपा आणि बिजु जनता दलामध्ये जागावाटपावरून बिनसले आहे. पहिली घोषणा कोणी केली याला महत्व नसून ही युती तुटण्यामागची कारणे महत्वाची मानली जात आहेत.
भाजपाचे ओडिशाचे प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल यांनी पोस्ट करून याची माहिती दिली आणि लोकसभाच नाही तर विधानसभा देखील एकट्याने लढण्याची घोषणा केली. यावरून काहीतरी मोठा वाद झाला असण्याची शक्यता राजकीय धुरिणांनी व्यक्त केली होती. भाजपा आणि बीजेडी आता स्वतंत्रपणे ओडिशातील २१ लोकसभा मतदारसंघात आणि १४७ विधानसभा मतदारसंघांत लढणार आहेत. दोन्ही पक्षांनी ओडिशाच्या लोकांच्या विकासाची, भविष्याची चिंता असल्याचे दाखविले असले तरी युती तुटण्यामागे कारण वेगळे आहे.
२०१४ मध्ये महाराष्ट्रात असाच घटनाक्रम घडला होता. ऐन विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भाजपामध्ये युती तोडण्यात आली होती. यामध्ये दोन्ही पक्षांच्या महत्वाकांक्षा कारणीभूत होत्या. २०१९ मध्ये हे दोघे पुन्हा एकत्र आले खरे परंतु ठाकरेंच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या खेळीमुळे महाराष्ट्रात वेगळ्या राजकारणाची सुरुवात झाली.
ओडिशातील युती तुटण्यामागे भाजपाच्या नेत्यांनी दोन कारणे दिली आहेत. नवीन पटनायक यांच्या बीजेडीने भाजपाला जेवढ्या जागा देऊ केल्या त्यावर भाजपा खूश नव्हती. बीजेडीने २१ पैकी ११ जागा भाजपाला दिल्या होत्या. काही राजकीय विष्लेशकांनुसार भाजपाला यापेक्षा जास्त जागा जिंकता येतील, असे भाजपाला वाटत होते.
दुसरे कारण असे की ओडिशामध्ये आम्ही नाही तर बीजेडी आमच्यासोबत युती करण्यासाठी इच्छुक आहे, असे भाजपाच्या नेत्यांनी पसरविले. यामुळे बीजेडीने भाजपाला एक का होईना जास्त जागा दिल्या, असा संदेश लोकांत पोहोचविला जात होता. या दोन कारणांमुळे भाजपा-बीजेडी युती तुटल्याचे भाजपातील सुत्रांनी सांगितले आहे.
भाजपाचा स्वार्थ काय...
बीजेडीने ११ लोकसभा जागा दिल्या होत्या, खासगी सर्व्हेनुसार त्यापेक्षा जास्त जागा भाजपाला जिंकता येणार होत्या. तसेच विधानसभेत बीजेडी भाजपाला ३५-४० जागांवर सीमित ठेवू इच्छित होती. तर भाजपाच्या अंतर्गत सर्व्हेनुसार भाजपा बहुमताच्या दिशेने जात होती. भाजपाचे यापेक्षाही मोठे लक्ष्य होते ते म्हणजे लोकसभेत ४०० पारचे. बीजेडीसोबत युती ठेवली असती तर भाजपाला ४०० जागांचे लक्ष्य गाठता आले नसते, असे भाजपाला वाटले, यामुळेच युती तोडण्यात आली.