पाटणा स्मार्टसिटी, नमामि गंगेचा निधी कुठे गेला? बिहारच्या प्रश्नांवरून सरकारला काँग्रेसचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 10:11 AM2024-05-26T10:11:21+5:302024-05-26T10:12:29+5:30
पाटणा विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा का नाकारला, असा सवाल काँग्रेसने भाजपला विचारला आहे.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने मोठ्या थाटामाटात पाटणा स्मार्ट सिटी, नमामि गंगे योजनेची घोषणा केली होती; मात्र, या दोन्ही योजनांचा निधी कुठे गेला आणि पाटणा विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा का नाकारला, असा सवाल काँग्रेसने भाजपला विचारला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाटलीपुत्र येथील प्रचारसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी समाज माध्यमावर भाजपला अनेक सवाल विचारले. स्मार्ट सिटी व नमामि गंगे योजनेशिवाय बिहता विमानतळ अद्याप का रखडले, बिहारमधील पेपर लीक प्रकरण का रोखले नाही? पाटण्यात २०१९ व २०२० मध्ये भीषण महापूर आला. अनेक ठिकाणी पाणी तुंबले. त्यावर तोडगा म्हणून स्मार्ट सिटी, नमामि गंगे योजना आणली. त्यात ११ कामे प्रस्तावित होती. त्यापैकी केवळ ४ कामे पूर्ण झाली असून, उर्वरित निधी कुठे गेला? अशी विचारणा त्यांनी केली.
बिहारकडे दुर्लक्ष
- लहान शहरांना हवाई मार्गाने जोडण्यासाठी केंद्र सरकारने उडाण योजना आणली. त्यात गुजरात व उत्तर प्रदेशमधील अनेक विमानतळांचा समावेश झाला. परंतु, बिहारमधील विमानतळाकडे दुर्लक्ष झाले.
- येथील बिहता विमानतळ २०२१ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित असताना, आतापर्यंत केवळ सुरक्षा भिंत बांधून झाली. आता विमानतळ होईल की नाही, असेही रमेश यांनी विचारले.