अखिलेश यादव यांची सायकल रुतली कोठे? जिथे मोठमोठे गुन्हे झाले तिथेही भाजप खुलली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 11:48 AM2022-03-11T11:48:03+5:302022-03-11T11:49:31+5:30
२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस त्यांच्यासोबत होती, तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मायावती. यावेळी राष्ट्रीय लोक दल, सुहेलदेव भारतीय समाज पक्षासारखे छोटे पक्ष त्यांच्यासोबत होते तर बसपा व काँग्रेस विरोधात.
सुधीर लंके
लोकमत न्यूज नेटवर्क
लखनऊ : उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाची ‘सायकल’ पुन्हा एकदा रुतली. ती अधिक जोमाने धावू शकली नाही. अखिलेश यादव या निवडणुकीत एकाकी झुंजताना दिसले. त्यांची प्रचारनीती ‘मोदी’ व ‘योगी’ यांचा करिष्मा पुसू शकली नाही.
२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस त्यांच्यासोबत होती, तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मायावती. यावेळी राष्ट्रीय लोक दल, सुहेलदेव भारतीय समाज पक्षासारखे छोटे पक्ष त्यांच्यासोबत होते तर बसपा व काँग्रेस विरोधात. त्यामुळे स्टार प्रचारक म्हणून सर्व भार अखिलेश यांच्यावर आला. स्वामीप्रसाद मौर्य यांसारख्या ओबीसी नेत्यांना सोबत घेऊन त्यांनी बिगर यादव ओबीसी मते जोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, मौर्यांसारखे नेतेच परभूत झाल्याने ही मते त्यांच्यासोबत पुरेशा प्रमाणात आलेली दिसत नाहीत. अनेक ठिकाणी बसपा व समाजवादी पक्ष यांच्यात मतविभागणी झाली. काही ठिकाणी मुस्लीम उमेदवारच आमनेसामने आले. त्याचा फटका बसला.
बाहुबली’ व ‘परिवारवादी’ पार्टी म्हणून मोदी-योगी यांनी समाजवादी पक्षावर टीका केली. यादव सत्तेत आले तर पुन्हा दादागिरी वाढेल, असा आक्रमक प्रचारही भाजपने केला. मतदारांच्या मनातील ही भीती अखिलेश दूर करू शकले नाहीत. ‘नयी हवा है, नयी सपा है,’ असा त्यांचा यावेळचा नारा होता. मात्र, नवीन समाजवादी पक्ष कसा असेल, हा अजेंडा मतदारांवर बिंबविण्यात ते कमी पडले. ‘गुंडगिरी’ व ‘माफियाराज’ या प्रचाराला उत्तरे देण्यातच ते अडकून पडले.
‘या’ जागांवरही भाजप विजयी
हाथरस : दलित मुलीवर सामूहिक अत्याचार
१४ सप्टेंबर २०२० राेजी एका १९ वर्षीय दलित मुलीवर सामूहिक अत्याचार झाला हाेता. सुरुवातीला याप्रकरणी काेणतीही कारवाई झाली नव्हती. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी आवाज उठविल्याने देशभर संताप व्यक्त झाला. मात्र, येथे भाजपचे अंजुला सिंह महाैर यांनी १ लाख ५४ हजार मते मिळवून दणदणीत विजय प्राप्त केला.
उन्नाव : महिलेवर बलात्कार, आमदारावर गुन्हा
भाजपचे आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्यावर एका महिलेचे अपहरण करून अत्याचार करण्याचा तसेच महिलेच्या वडिलांसह तीन नातेवाइकांची हत्या केल्याचाही गुन्हा नोंदविण्यात आला होता. सेंगर यांना पोक्सोसह अन्य गुन्ह्यांप्रकरणी अटकही झाली होती. मात्र, येथे भाजपचे उमेदवार पंकज गुप्ता विजयी झाले आहे. उन्नावमध्ये अत्याचार पीडितेच्या आईला काँग्रेसने उमेदवारी दिली होती.
लखीमपूर : शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडले
जिल्ह्यातील सर्व ८ जागांवर भाजपने पुन्हा बाजी मारली. लखीमपूरमधील टिकुनिया येथे शेतकरी आंदोलनादरम्यान केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष याने ८ शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांचा जीव घेतल्याचा गुन्हा दाखल आहे. त्याचा निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र,
घटना घडली त्या निघोसन मतदारसंघात भाजपचे विद्यमान
आमदार शशांक वर्मा पुन्हा निवडून आले आहेत.