अयोध्येत मशीदीचे काम कुठेपर्यंत आलेय? राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यावेळी आली महत्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 12:33 PM2024-01-22T12:33:16+5:302024-01-22T12:33:50+5:30
राम मंदिर बांधण्याच्य़ा घोषणेनंतर लगेचच मशीदही बांधण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने निकालावेळी अयोध्येत मशीदही बांधली जाणार असे सांगितले होते.
अयोध्येत भगवान रामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरु झाला आहे. अशातच अयोध्येतील मशीदीबाबत महत्वाची माहिती समोर येत आहे. राम मंदिर बांधण्याच्य़ा घोषणेनंतर लगेचच मशीदही बांधण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु, अद्याप या मशीदीच्या कामाला सुरुवात झालेली नाहीय. येत्या मे महिन्यापासून अयोध्येतील मशीदीचे काम सुरु केले जाणार असल्याचे इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशनने म्हटले आहे.
रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार या मशीदीचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी तीन ते चार वर्षे लागण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर-बाबरी मशीदीच्या वादावर निकाल देताना पाच एकर जागेवर मशीददेखील बांधण्याचा निर्णय दिला होता. यानुसार अयोध्येतच मशीदही बांधली जाणार आहे. या मशीदीचे फोटोही मध्यंतरीच्या काळात समोर आले होते.
हाजी अराफत शेख यांच्या अध्यक्षतेखालील इंडो-इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनच्या विकास समितीच्या देखरेखीखाली मशीद प्रकल्पाची देखरेख केली जात आहे. या मशिदीसाठी निधी उभारण्यासाठी क्राऊड फंडिंग वेबसाइट सुरू करण्याची तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या या मशिदीचे नाव पैगंबर मुहम्मद यांच्या नावावरून 'मस्जिद मुहम्मद बिन अब्दुल्ला' असे ठेवण्यात येणार आहे.
मशीदीच्या कामावर प्रतिक्रिया देताना शेख यांनी सांगितले की, तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य असो किंवा नसो, आम्हाला लोकांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम निर्माण करायचे आहे. लोकांमधील वैर आणि द्वेष दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपल्या मुलांना आणि लोकांना चांगल्या गोष्टी शिकवल्या तर हा लढा आपोआप संपेल.
मशीदीसाठी अद्याप निधी उभारण्यात आलेला नाहीय. कोणाशी संपर्कही साधण्यात आलेला नाहीय. मशीदीच्या निर्माणात विलंब झाला आहे हे मान्य आहे, याचे कारण याचे डिझाईन आणि पारंपरिक गोष्टी जोडायच्या होत्या. मशीदपरिसरात ५०० बेडचे हॉस्पिटलही सुरु केले जाणार आहे, असे आआयसीएफचे अध्यक्ष जुफर अहमद फारूकी यांनी म्हटले आहे.