मंदी... कुठे आहे मंदी, नवरात्री - दसऱ्याला महागड्या उत्पादनांच्या विक्रीत 15 ते 25 टक्क्यांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2017 03:11 PM2017-10-02T15:11:48+5:302017-10-02T15:13:53+5:30
नोटाबंदी नी जीएसटीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडल्याच्या बातम्या सगळीकडे येत असताना, नवरात्र व दसऱ्याच्या मुहूर्तावर उपभोगाच्या वस्तुंची खरेदी चांगलीच वाढल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नवरात्री व दसऱ्याला होणारी खरेदी 15 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले आहे
मुंबई - नोटाबंदी नी जीएसटीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडल्याच्या बातम्या सगळीकडे येत असताना, नवरात्र व दसऱ्याच्या मुहूर्तावर उपभोगाच्या वस्तुंची खरेदी चांगलीच वाढल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नवरात्री व दसऱ्याला होणारी खरेदी 15 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले आहे.
विशेष म्हणजे, केवळ शहरांमध्येच नाही तर लाहन सहान शहरांमध्ये व खेड्यांमध्येही महागडी उपकरणे विकत घेण्याचा कल वाढला असल्याचे दिसत आहे. देशभरामध्ये महाग उत्पादने घेण्याकडे ग्राहकांचा कल असल्याचे मारुति, हुंदाई, एलजी, सोनी, पॅनासॉनिक व गोदरेज अप्लायंसेस या कंपन्यांनी म्हटले आहे. चांगला पाऊस व स्वस्तात उपलब्ध असलेली कर्जे यामुळे भारताच्या कानाकोपऱ्यात ग्राहकांच्या खरेदीला वेग आल्याचे इकॉनॉमिक टाइम्सने म्हटले आहे. सोनी इंडियाचे सेल्स हेड सतीश पद्मनाभन यांच्या सांगण्यानुसार नवरात्रीमध्ये ग्राहकांची क्रयशक्ती वाढल्याचे जाणवत आहे.
आता आतापर्यंत मोठ्या आकाराचे टिव्ही केवळ शहरांमध्ये खपत असत.
मात्र, आता खेड्यांमधले ग्राहकही 60 ते 65000 रुपये किमतीचे टिव्हीसेट घेत असल्याचा दाखला पद्मनाभन यांनी दिला आहे. एलजी इलेक्ट्रॉनिक्सचे इंडिया सीएमओ अमित गुजराल यांच्या सांगण्यानुसार जीएसटी व नोटाबंदी यांमुळे झालेला विपरीत परिणाम आता मागे पडला आहे आणि या नवरात्री व दसऱ्याला विक्रीमध्ये 30 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ विक्रीमध्ये झाली आहे.
नवरात्रीमध्ये मारुतिच्या गाड्यांची नोंदणी 18 टक्क्यांनी वाढली तर विक्री 15 टक्क्यांनी वाढली आहे. तर हुंदाईसाठी ही नवरात्र विक्रमी ठरली असून कंपनीच्या गाड्यांची विक्री तब्बल 50 टक्क्यांनी वाढली आहे. ओणम व गणेशोत्सवामध्ये तयार झालेल्या उत्साही वातावरणाने नवरात्रीमध्ये कळस गाठल्याची भावना हुंदाई मोटर्स इंडियाचे सेल्स व मार्केटिंगचे संचालक राकेश श्रीवास्तव यांनी व्यक्त केली आहे. या नवरात्रीमध्ये 26000 गाड्या जास्त विकल्या गेल्या असून दिवाळीमध्येही विक्रमी विक्री होईल असा अंदाज आहे.
महागडे रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशिन्स व इन्हर्टर एसीची विक्रीही या उत्सवी मोसमात 25 टक्क्यांनी वाढली आहे.