कहाँ एैसा 'याराना'... देवेंद्रने 1300 किमी गाडी चालवून मित्राला दिला ऑक्सिजन अन् लढाई जिंकली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 09:43 AM2021-04-28T09:43:33+5:302021-04-28T09:46:21+5:30
संजय यांच्याकडून राजनच्या प्रकृतीबद्दल माहिती मिळाल्यानंतर बालपणीच्या मित्रासाठी काहीही करायची तयारी दर्शवत देवेंद्रकुमार यांनी धावपळ सुरू केली. रांचीवरुन मध्यरात्रीच 150 किमी दूरवर असलेल्या बोकारोला निघाले.
नवी दिल्ली - कोरोना महामारीच्या संकटाचा सामना करताना सर्वत्र विदारक चित्र पाहायला मिळत आहे. सायरन वाजणाऱ्या अॅम्बुलन्सचा आवाज, रुग्णालयात रडणारे नातवाईक, रुग्णांचे होत असलेले हाल आणि सोशल मीडियावर व्हायरल होणारे, न पाहवणारे व्हिडिओ आणि फोटो. या सगळ्यातही एखादी चांगली बातमी मनाला सुखद धक्का देते आणि माणूसकी जिवंत असल्याचा परिचय येतो. मित्रासाठी धावणारा मित्र पाहिल्यावर मैत्रीसाठी बाजी लावणारी उदाहरण एक आदर्श बनल्याचं दिसून येते. अशाच एका मित्राने मित्राचा जीव वाचविण्यासाठी तब्बल 1300 किमीचा बायरोड प्रवास केला.
रांची येथील देवेंद्रकुमार यांनी मैत्रीसाठी कायपण... म्हणत आदर्श मैत्रीचं उदाहरण जगासमोर ठेवलंय. 24 एप्रिलो रोजी रांचीच्या वैशाली गाझियाबाद येथील रहिवाशी असलेल्या संजय सक्सेना यांचा देवेंद्रकुमार यांना फोन आला. कोरोना झाल्यामुळे राजनकुमार यांना ऑक्सिजनची मोठी गरज आहे. सध्या केवळ एका दिवसाचा ऑक्सिजन शिल्लक असून पुढील ऑक्सिजन मिळेना झालाय. माझ्या घरीच राजनवर उपचार सुरू आहेत, असे संजय यांनी सांगितले.
संजय यांच्याकडून राजनच्या प्रकृतीबद्दल माहिती मिळाल्यानंतर बालपणीच्या मित्रासाठी काहीही करायची तयारी दर्शवत देवेंद्रकुमार यांनी धावपळ सुरू केली. रांचीवरुन मध्यरात्रीच 150 किमी दूरवर असलेल्या बोकारोला निघाले. मात्र, बोकारो येथे ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध झाला नाही, त्यानंतर देवेंद्र यांनी झारखंडमधील गॅस प्लँटचे मालक राकेश कुमार गुप्ता यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी, राकेश यांनी देवेंद्रसाठी एका सिलेंडरची सोय केली. आता, ऑक्सिजन सिलेंडर मिळाला पण हा सिलेंडर 1300 किमी दूर म्हणजे वैशाली गाझियाबाद येथे न्यायचा होता. 1300 किमाचा हा प्रवास म्हणजे जीवन-मरणाऱ्या संघर्षातील अंतर होतं. मात्र, देवेंद्रने हार मानली नाही.
देवेंद्रकुमार यांनी एका मित्राकडे चारचाकी गाडी मागितली. त्यानंतर स्वत; गाडी चालवत तब्बल 1300 किमीचा प्रवास केला. या प्रवासासाठी त्यांना 24 तास लागले. अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त असल्याने त्यांना ऑक्सिजन सिलेंडरबाबत विचारणाही करण्यात आली. त्यावेळी, दोस्ताच्या जीव वाचविण्यासाठी होत असलेली धडपड देवेंद्र यांनी सांगितली. त्यानंतर, सोमवारी दुपारी देवेंद्र वैशाली गाझियाबाद येथे पोहोचले. वेळेत राजन यांना ऑक्सिजन सिलेंडर मिळाले अन् त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
देवेंद्र आणि राजन हे दोन्ही बालपणीचे मित्र असून दोघेही बोकारो येथेच लहानाचे मोठे झाले आहेत. आपल्या महाविद्यालयीन शिक्षणानंतर देवेंद्र इंश्युरन्स आणि राजन आयटी सेक्टरमध्ये नोकरीला लागले. सध्या दोघांचेही वय 34 वर्षे एवढे आहे. राजन सध्या आपल्या पत्नीसोबत नोएडा येथे राहतात, तर देवेंद्र अविवाहीत असून रांची येथे राहतात. आजही देवेंद्र बाकारो येथे राजनच्या उपचारासाठी थांबला आहे, आता मित्राला बरं करुनच आपण कामाला लागणार असा चंग देवेंद्रने बांधला आहे. देवेंद्र आणि राजन यांचा याराना जगभरातील मैत्रीसाठी आदर्श उदाहरण आहे.