‘टिकैत हवे की डकैत, तुम्हीच ठरवा’; भावनिक आवाहनानंतर सीमांवर पुन्हा गर्दी!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 06:15 AM2021-01-30T06:15:54+5:302021-01-30T06:16:07+5:30
आज एक दिवसाचे उपोषण, भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष बलवीर राजेवाल यांनी शेतकऱ्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. त्यामुळे इथला संघर्ष टळला. इथे आता शेतकऱ्यांची गर्दी होत असून शुक्रवारी सायंकाळपर्यंत ६० हजारांपेक्षा अधिक शेतकरी या सीमेवर आहेत.
विकास झाडे
नवी दिल्ली : सरकारने मृतावस्थेत आणलेल्या शेतकरी आंदोलनामध्ये शुक्रवारी पहाटेपासूनच पुन्हा नवा जोश संचारला आहे. हजारो शेतकरी विविध सीमांवर गर्दी करीत आहेत. केंद्र सरकारला डाकूंची उपमा देत तुम्हाला ‘टिकैत हवेत की डकैत’ या शेतकरी नेत्यांच्या भावनिक आवाहनाला काही तासांतच उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
२६ जानेवारीच्या संघर्षानंतर नंतरचे दोन दिवस शेतकरी नेते आणि लाखो शेतकऱ्यांसाठी अतिशय कठीण गेलेत. लक्षवेधी आंदोलन भूतकाळात जमा होईल असे चित्र निर्माण झाले होते. आंदोलकांची संख्या कमी होताना पाहून पोलीसही विविध सीमांवर दंडा उगारून होते. यात पलवल सीमेवरील आंदोलन संपविण्यात पोलीस दलाला यश आले. दुसरा नंबर होता गाझीपूर सीमेचा. इथले नेत्वृत्व राकेश टिकैत करीत आहे. गुरुवारी रात्री अर्धसैनिक बल आणि पोलिसांच्या अनेक तुकड्या गाझीपूर सीमेवर तैनात होत्या. योगी सरकारने या सीमेवरून आंदोलकांना हटविण्याच्या सूचना दिल्या होत्या. आपल्यावर रात्री आपत्ती येऊ शकते हे राकेश टिकैत यांनी हेरले. त्यांनी लगेच माध्यमांपुढे आपल्या भावना व्यक्त करीत अश्रुंना वाट मोकळी करुन दिली. दोन महिन्यांपासून आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी ही बाब गंभीरतेने घेत, आता आम्ही सरकारच्या डोळ्यात आसंव पाहू असा निश्चय केला. समाजमाध्यमांवरून शेतकऱ्यांना ‘फिरते व्हा’ चे आवाहन करण्यात आले. त्याला इतका मोठा प्रतिसात मिळाला की १२ तासांतच ३० हजारांपेक्षा अधिक शेतकरी गाझीपूर सीमेवर आलेत. पलवलच्या सीमेवरून हाकलण्यात आलेले शेतकरीही गाझीपूर सीमेवर पोहचले. या सीमेवर पहिल्यांदाच ४० हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांची गर्दी झाली आहे. आता सरकारसोबत आरपारची लढाई करू असा संकल्पही करण्यात आला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांची संख्या वाढतानाचे पाहून पिटाळण्यासाठी सज्ज असलेले सुरक्षा बल माघारी फिरले. टिकैत यांचे भावनिक आवाहन ऐकून हरियाणा, उत्तराखंड, पंजाब, उत्तर प्रदेशमधून शेतकरी मोठ्या संख्येने पुन्हा गाझीपूर, सिंघू सीमेवर येत आहेत.
स्वातंत्र्यदिनी तुम्ही तिरंग्याचा अवमान केला असे कारण करीत शुक्रवारी दुपारपासूनच सिंघू सीमेलगतचे स्थानिक जरा आक्रमक झाले होते. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार हजाराच्या जवळपास लोक होते. ते सगळेच भाजपचे असल्याचे शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे. या टोळीने शेतकऱ्यांवर दगडफेक केली. त्यांनी सिंघू सीमा मोकळी करण्याचे सांगितले. शेतकरी हे अतिरेकी, देशद्रोही असल्याच्या घोषणा दिल्यात. प्रारंभी पोलीस मूकदर्शक होती. नंतर अश्रूधूर सोडला. यामागे स्थानिक आमदार असल्याचा आरोप राकेश टिकैत यांनी केला. एका स्थानिकाने तिथे तिरंगा झेंडा फडकवला. भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष बलवीर राजेवाल यांनी शेतकऱ्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. त्यामुळे इथला संघर्ष टळला. इथे आता शेतकऱ्यांची गर्दी होत असून शुक्रवारी सायंकाळपर्यंत ६० हजारांपेक्षा अधिक शेतकरी या सीमेवर आहेत.
राजकीय पाठिंबा!
२६ जानेवारीच्या घटनेनंतर विरोधी राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या मदतीला धावले आहेत. कॉँग्रेसने पाठिंबा दिला आहे. गाझीपूर सीमेवर उत्तर प्रदेशातील कॉँग्रेसचे नेते येऊन गेलेत. अखिलेश यादव यांनी टिकैत यांना फोन करुन पाठींबा दर्शवला. अरविंद केजरीवाल यांच्या वतीने उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी टिकैत यांची भेट घेतली. अजित सिंग चौधरी यांचा निरोप घेऊन त्यांचे पुत्र जयंत चौधरी हे सुद्धा गाझीपूर सीमेवर पोहचले आहेत.
आंदोलन सुरूच राहील - नरेश टिकैत
मुजफ्फरनगर येथे भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी नरेश टिकैत यांनी गाझीपूर सीमेवर सुरू असलेले आंदोलन समाप्त करण्याची घोषणा गुरुवारी केली होती. परंतु रात्री या सीमेवर झालेल्या प्रकारामुळे त्यांनी घोषणा मागे घेतली. रात्री किसान भवन येथे आपतकालीन पंचायत बोलावण्यात आली आणि चौधरी नरेश टिकैत यांनी आता आंदोलन चालूच राहील असे सांगितले.