दिल्लीचेही तख्त जिंकतो महाराष्ट्र माझा! 'हे' नेते प्रचारासाठी राजधानीत तळ ठोकून होते
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 08:57 IST2025-02-09T08:57:22+5:302025-02-09T08:57:58+5:30
भाजपने खोटी आश्वासने देण्यापेक्षा मौखिक प्रचारावर भर दिला होता, असेही गोपछडे यांनी सांगितले.

दिल्लीचेही तख्त जिंकतो महाराष्ट्र माझा! 'हे' नेते प्रचारासाठी राजधानीत तळ ठोकून होते
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या विजयात महाराष्ट्राचा खारीचा वाटा उचलला असल्याची भावना राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक नेते प्रचारासाठी दिल्लीत तळ ठोकून होते, हे येथे उल्लेखनीय.
‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ या गीताप्रमाणे महाराष्ट्राने दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचा गड मिळवून दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी, वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि रक्षा खडसे यांनी वेगवेगळ्या मतदारसंघांत प्रचार केला होता.
दिल्लीचा निकाल म्हणजे भाजपच्या मायक्रो-मॅनेजमेंटची कमाल होय, असे मत खा. डॉ. अजित गोपछडे यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्याकडे करोलबाग जिल्ह्याची जबाबदारी होती. दिल्लीची जनता आपच्या अलिबाबा आणि ४० चोरांच्या पक्षाला कंटाळली होती. त्यांना भाजपच्या रूपात पर्याय दिसत होता.
भाजपने खोटी आश्वासने देण्यापेक्षा मौखिक प्रचारावर भर दिला होता, असेही गोपछडे यांनी सांगितले.
या नेत्यांनी केला प्रचार
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, आयुष खात्याचे मंत्री प्रतापराव जाधव, माजी अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, राज्यातून लोकसभा आणि राज्यसभेतील भाजपचे खासदार प्रचार करायला होते. यात उदयनराजे भोसले, अनुप धोत्रे, स्मिता वाघ, डॉ. हेमंत सावरा, राज्यसभेच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे, संदिपन भुमरे, श्रीरंग आप्पा बारणे, नरेश म्हस्के आदी नेत्यांनी दिल्लीच्या रणांगणात प्रचार केला.
२४१ खासदारांची ड्युटी
राष्ट्रीय मराठा संघाचे आनंद रेखी यांच्यानुसार, दिल्लीत भाजपने पक्षाच्या मुख्यमंत्र्यांबरोबरच २४१ खासदारांची ड्युटी लावली होती. ५ तारखेपर्यंत दिल्लीतच थांबा, असे खासदारांना सांगण्यात आले होते.