धक्कादायक ! तलावात बुडणाऱ्या लोकांना वाचवताना जवानाच्या हाती लागला त्याच्याच आईचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 12:34 PM2021-08-10T12:34:26+5:302021-08-10T12:37:17+5:30
Big accident in dantewada: या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 19 जण जखमी झाले आहेत.
दंतेवाडा:छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात सोमवारी एक ट्रॅक्टर ट्रॉली तलावात कोसळली. या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 19 जण जखमी झाले आहेत. यादरम्यान एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. ट्रॅक्टर तलावात कोसळल्यानंतर, त्याच परिसरात सर्च ऑपरेशनसाठी आलेली DRG (डिस्ट्रिक्ट रिजर्व ग्रुप) च्या पथकानं बुडणाऱ्या लोकांना वाचवण्यासाठी तलावात उड्या मारल्या. यावेळी बचाव कार्यातील एका जवानाच्या हाती त्याच्याच आईचा मृतदेह लागला. विशेष म्हणजे, या अपघातात त्याचीही आई पाण्यात पडली आहे, हे त्याला माहित नव्हते.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फूके कवासी नावाची महिला दंतेवाडा जिल्ह्यातील कटेकल्याण ब्लॉकच्या टेटमची रहिवासी होती. ही महिला गावातील 25-30 लोकांसोबत आदिवासी दिवसावर आयोजित एका कार्यक्रमासाठी हीरानारकडे जात होती. हे सर्व लोक एका ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये बसले होते. यावेळी अचानक चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर बाजुच्या तलावात कोसळला.
या अपघातावेळी DRG च्या जवानांचे तेलम-टेटम परिसरात सर्च ऑपरेशन सुरू होते. त्यांना या अपघातातील जखमींचा आवाज ऐकू आला. त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली आणि पाण्यात उड्या मारुन लोकांना वाचवणे सुरू केले. यावेळी या पथकातील जवान वसू कवासीला ट्रॅक्टरखाली कुणीतरी अडकल्याचे जाणवले.
कवासीच्या हातात एका महिलेचा मृतदेह आला. त्याने त्या महिलेला बाहेर काढल्यानंतर त्याला खूप मोठा धक्का बसला. हातात आपल्या आईचा मृतदेह पाहून तो ओक्साबोक्शी रडू लागला. विशेष म्हणजे आपली आईदेखील या ट्रॅक्टरमध्ये होती, हे त्याला माहित नव्हते. या ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने परिसरातील सर्वांनाच धक्का बसला आहे. दरम्यान, अपघातात फूके कवासी यांच्यासह 9 वर्षीय दिनेश मरकाम, 16 वर्षीय दसई कवासी आणि 35 वर्षीय कोसा माडवीचा मृत्यू झाला आहे, तर 19 जण जखमी झाले आहेत.