आरक्षणावर अफवा पसरवल्या जातायत, राजनाथ सिंह यांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2018 02:15 PM2018-04-03T14:15:41+5:302018-04-03T14:15:41+5:30
गेल्या काही दिवसांपासून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती(अॅट्रॉसिटी)मधल्या कायद्यातील बदलानंतर उफाळलेल्या हिंसाचारावर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज सभागृहात स्पष्टीकरण दिलं आहे.
नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती(अॅट्रॉसिटी)मधल्या कायद्यातील बदलानंतर उफाळलेल्या हिंसाचारावर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज सभागृहात स्पष्टीकरण दिलं आहे. भारत बंददरम्यान झालेल्या हिंसाचारावर सदनात स्वतःची सरकारची बाजू राजनाथ सिंह यांनी मांडली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विरोध करत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती(अॅट्रॉसिटी)मधल्या कायद्यातील बाजूनं केवळ 6 दिवसांत केंद्र सरकारनं फेरविचार याचिका दाखल केली आहे. त्यामुळे लोकांनी शांतता राखावी, असं आवाहन राजनाथ सिंह यांनी केलं आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लोकांच्या हक्क्याच्या रक्षणासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे, असं राजनाथ सिंह म्हणाले, त्यानंतर विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला.
अॅट्रॉसिटी कायद्यात सर्वोच्च न्यायालयानं बदल केल्यामुळे केंद्र सरकारची विरोधकांनी चारही बाजूंनी कोंडी केली आहे. एनडीएच्या सरकारनं अॅट्रॉसिटी हा कायदा कमकुवत केलेला नाही. तर 2015च्या कायद्यात संशोधन करून आणखी मजबूत केला आहे. परंतु काही लोकांनीही आरक्षण बंद झाल्याच्या अफवाही उठवल्याचंही राजनाथ सिंह यांनी सभागृहात सांगितलं आहे.