विरोधकांचं ऐक्य होत असतानाच, भाजपाची मोठी खेळी, नवा मित्र जोडत NDA चं बळ वाढवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 10:32 AM2023-07-16T10:32:06+5:302023-07-16T10:36:19+5:30
OP Rajbhar Joined NDA: एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात सर्व विरोधी पक्षांचं ऐक्य घडवून आणण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. तर या ऐक्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपानेही आपल्या नेतृत्वाखालील एनडीएचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून राजकीय डावपेच खेळण्यास सुरुवात झाली आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात सर्व विरोधी पक्षांचं ऐक्य घडवून आणण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. तर या ऐक्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपानेही आपल्या नेतृत्वाखालील एनडीएचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. त्याला यश मिळताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये जितनराम मांझी यांचा पक्ष एनडीएमध्ये दाखल झाल्यानंतर आता. उत्तर प्रदेशात एका बड्या नेत्याच्या पक्षाने एनडीएमध्ये प्रवेश केला आहे.
उत्तर प्रदेशमधील दिग्गज नेते असलेल्या ओमप्राकाश राजभर यांच्या पक्षाने एनडीएमध्ये प्रवेश केला आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे. अमित शाह यांनी ट्विट करत सांगितले की, ओपी राजभर यांची दिल्लीमध्ये भेट झाली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे. मी त्यांचं एनडीएमध्ये स्वागत करतो. ओमप्रकाश राजभर यांच्या येण्यामुळे एनडीएला बळकटी मिळणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएकडून गरीब आणि वंचितांच्या हितासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना बळ मिळेल, असे अमित शाह म्हणाले.
श्री @oprajbhar जी से दिल्ली में भेंट हुई और उन्होंने प्रधानमंत्री श्री @narendramodi जी के नेतृत्व वाले NDA गठबंधन में आने का निर्णय लिया। मैं उनका NDA परिवार में स्वागत करता हूँ।
— Amit Shah (@AmitShah) July 16, 2023
राजभर जी के आने से उत्तर प्रदेश में एनडीए को मजबूती मिलेगी और मोदी जी के नेतृत्व में एनडीए द्वारा… pic.twitter.com/uLnbgJedbF
दरम्यान, ओमप्रकाश राजभर यांनी अखिलेश यादव यांची साथ सोडल्याने हा समाजवादी पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहेत. तसेच गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला कडवी टक्कर देणाऱ्या अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षालाही गळती लागली आहे. समाजवादी पक्षातील बडे नेते आणि मऊमधील घोसी विधानसभा मतदारसंघातील आमदार दारा सिंह चौहान यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. दारा सिंह चौहान यांनी विधानसभा अध्यक्ष सतीश महाना यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. आता दारा सिंह चौहान हे पुन्हा एकदा भाजपामध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.