भारताच्या चौफेर दबावापुढे व्हाइट हाऊस नमले, ट्रम्प यांच्या वक्तव्याबाबत हे स्पष्टीकरण दिले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 02:06 PM2019-07-23T14:06:31+5:302019-07-23T14:27:02+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नी केलेल्या वक्तव्यामुळे वॉशिंग्टनपासून नवी दिल्लीपर्यंत खळबळ उडाली आहे.
नवी दिल्ली/वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नी केलेल्या वक्तव्यामुळे वॉशिंग्टनपासून नवी दिल्लीपर्यंत खळबळ उडाली आहे. दरम्यान, भारताकडून या प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्यानंतर अमेरिका या प्रकरणी बॅकफूटवर गेली असून, अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयानंतर आता व्हाइट हाऊसनेही यबाबत स्पष्टीकरण दिले आहे. काश्मीर प्रश्न हा भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय प्रश्न असून, दोन्ही देशांनी चर्चेच्या माध्यमातून तो सोडवला पाहिजे, असे व्हाइट हाऊसने म्हटले आहे.
नरेंद्र मोदी आणि माझे चांगले संबंध आहेत, काश्मीर प्रश्नावर मोदींनी माझ्याकडे मदत मागितली होती. मलादेखील भारत आणि पाकिस्तानमधील या मुद्द्यावर मध्यस्थी करण्यास आवडेल, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष। डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. मात्र भारताने या वक्तव्यावर तत्काळ आक्षेप नोंदवला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशी कुठलीही विनंती केली नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही संसदेमध्ये ट्रम्प यांचा दावा खोडून काढला आहे.
दरम्यान, ट्रम्प यांना काश्मीर प्रश्न माहीत नाही. त्यामुळेच ते काय बोलले हे त्यांचं त्यांनाच कळलं नसावं असं शशी थरूर यांनी म्हटलं आहे. तसेच काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी तिसऱ्या कोणाचीही आवश्यकता नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ट्रम्प यांना अशाप्रकारचे आवाहन करतील हे शक्यच नाही. जर भारताला पाकिस्तानशी बोलायचं असेल तर भारताने थेट चर्चा केली पाहिजे आणि हेच भारताचे धोरण आहे असं थरूर यांनी म्हटलं आहे.