कोण आहे 'मोस्ट वाँटेड' अब्दुल सुभान कुरेशी ऊर्फ तौकीर?; कुठे-कुठे केलेत हल्ले?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2018 02:23 PM2018-01-22T14:23:06+5:302018-01-22T14:56:45+5:30
दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई करत अब्दुल सुभान कुरेशी ऊर्फ तौकीरला अटक केली. तौकीरवर एनआयएनं 4 लाखांचं बक्षीसही जाहीर केलं होतं.
नवी दिल्ली- दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई करत अब्दुल सुभान कुरेशी ऊर्फ तौकीर या दहशतवाद्याला अटक केली. तौकीरवर एनआयएनं 4 लाखांचं बक्षीसही जाहीर केलं होतं. अब्दुल सुभान कुरेशी हा हाजी उस्मान कुरेशी यांचा मुलगा आहे. इंग्रजी माध्यमातून शिकलेला हा तौकीर भारतातील मोस्ट वाँटेड दहशतवादी आहे. भारताचा बिन लादेन अशीही तौकिरची ओळख आहे.
व्यवसायानं सॉफ्टवेअर असलेल्या तौकिरनं अनेक नामवंत कंपन्यांमध्ये नोकरी केली. उत्तर प्रदेशमधल्या आणि महाराष्ट्रात यानं शिक्षणाचे धडे गिरवले आहेत. व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेला कुरेशी बॉम्ब बनवण्यात तरबेज आहे. मुंबई साखळी बॉम्बस्फोट, अहमदाबाद, जयपूर यांसारख्या अनेक स्फोटांमध्ये त्याचा हात असल्याचं म्हटलं जातं. तौकीर वर्षं 1999 आणि 2000 दरम्यान दहशतवादी हालचालींमध्ये सक्रिय झाला होता.
2007 ते 2013मध्ये देशातील अनेक बॉम्बस्फोटात त्याचा हात होता. बिहारमधल्या बोधगयामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातही त्याचं नाव पुढे आलं होतं. तसेच 2008मध्ये गुजरातमधील अहमदाबाद आणि सूरतमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड होता. या बॉम्बस्फोटात 56 लोक मारले गेले होते. तर 238 जण जखमी होते. कुरेशी यानं 2007-08मध्ये सिमीसाठी 4 ट्रेनिंग कॅम्प बनवले होते.
कुरेशीकडून बॉम्ब तयार करण्याचं सामान जप्त करण्यात आलं आहे. अब्दुल सुभान कुरेशी हा दहशतवादी 26 जानेवारी रोजी राजधानीत मोठा बॉम्बस्फोट करण्याच्या तयारीत होता. पी. चिदंबरम केंद्रीय गृहमंत्री असताना त्यांनी 50 वाँटेड दहशतवाद्यांची यादी प्रसिद्ध केली होती. त्या यादीत इंडियन मुजाहिद्दीनचा हा दहशतवादी अब्दुल सुभान कुरेशी याचंही नाव होतं. इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांना बॉम्बस्फोट घडवण्यासाठी कुरेशी हा उकसावत असल्याचंही समोर आलं आहे. दिल्लीच नव्हे तर देशातल्या इतर भागातील दहशतवादी हल्ल्यातही कुरेशी सहभाग असल्याचं उघड झालं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, 2008च्या बॉम्बस्फोटात मुजाहिद्दीनच्या ज्या दहशतवाद्यांना पकडण्यात आलं होतं. त्यांनीही चौकशीत कुरेशी याचं नाव घेतलं होतं. इतकंच नव्हे तर गुजरातमधल्या दहशतवादी हल्ल्यातही कुरेशीचा हात होता.