मुकुल रोहतगींनंतर कोण? साळवे की कुमार ?
By admin | Published: June 12, 2017 04:35 PM2017-06-12T16:35:01+5:302017-06-12T16:39:39+5:30
अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्यानंतर या पदावर कोणाची नियुक्ती होणार याबाबत राजधानीत चर्चा सुरु आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि 12- भारताचे महान्यायवादी (अॅटर्नी जनरल) मुकुल रोहतगी यांच्या कार्यकाळ येत्या 19 जून रोजी समाप्त होत आहे. रोहतगी यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून आपल्याला कार्यकाळ संपल्यानंतर पदावरुन मुक्त करावे असे पत्र लिहिले आहे. आता यावर सरकारने निर्णय घ्यायचा आहे असे रोहतगी यांनी स्पष्ट केले आहे. रोहतगी यांनी पदावरुन मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर आता अॅटर्नी जनरलपदी कोणाची नियुक्ती होणार याबाबत चर्चा सुरु झाली आहे. या पदासाठी सध्या ज्येष्ठ वकील हरिश साळवे आणि सध्या सॉलिसिटर जनरल असणारे रणजित कुमार यांची नावे चर्चेमध्ये सर्वात आघाडीवर आहेत.
मोहन परासरन यांच्यानंतर रणजित कुमार यांची सॉलिसिटर जनरलपदी 2014 साली नेमणूक झाली होती. त्याचप्रमाणे नव्याने सत्तेमध्ये आलेल्या रालोआ सरकारने 19 जून 2014 रोजी रोहतगी यांची अॅटर्नी जनरलपदावर नेमणूक केली होती. रोहतगी यांनी या तीन वर्षांमध्ये महत्त्वाच्या विविध खटल्यांमध्ये सरकारची बाजू मांडली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये कुलभूषण जाधव खटल्यामध्ये नुकतीच भारताची यशस्वी बाजू मांडणाऱ्या साळवे यांचे नाव देशातील सर्वाधीक फी घेणाऱ्या वकिलांमध्ये घेतले जाते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळामध्ये तत्कालीन अॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांनी पदावरुन मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर हरिश साळवे यांनी या पदाची ऑफर नाकारली होती. 2014 सालीही त्यांनी अॅटर्नी जनरलपद स्वीकारावे अशी इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली होती असे सांगितले जाते, मात्र यावेळेसही साळवे यांनी त्यास नकार दिला होता.