‘ईव्हीएमवर खापर फोडणे ही गुन्हेगारी मानसिकता’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 04:47 AM2019-08-12T04:47:57+5:302019-08-12T04:48:15+5:30
निवडणूक हरल्यानंतर त्याचे खापर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर फोडणे हे केवळ अयोग्य नाही तर यातून गुन्हेगारी मानसिकता दिसून येते, असा टोला मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी रविवारी ‘ईव्हीएम हटाव लॉबी’ला मारला.
कोलकाता : निवडणूक हरल्यानंतर त्याचे खापर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर फोडणे हे केवळ अयोग्य नाही तर यातून गुन्हेगारी मानसिकता दिसून येते, असा टोला मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी रविवारी ‘ईव्हीएम हटाव लॉबी’ला मारला.
आयआयएम-कोलकातामध्ये भरलेल्या वार्षिक व्यापारी परिषदेत बोलताना अरोरा म्हणाले की, यंत्र म्हटले की ते कधी तरी बिघडणे, नीट न चालणे या गोष्टी होणारच. हे फक्त मतदानयंत्रांच्या बाबतीतच नव्हे तर सर्वच यंत्रांच्या बाबतीत घडते; पण मतदानयंत्रांमध्ये मुद्दाम कोणी घोटाळा करू शकत नाही, हे लक्षात घ्यायला हवे. यंत्र नीट न चालणे व त्यात मुद्दाम हेराफेरी करणे या दोन भिन्न गोष्टी आहेत; पण हे लक्षात न घेता कोणी ‘ईव्हीएम’ना मुद्दाम लक्ष्य करीत असेल तर ती मानसिकता गुन्हेगारी स्वरूपाची म्हणावी लागेल.
ते असेही म्हणाले की, दैनंदिन वापराच्या अन्य कोणत्याही यंत्राप्रमाणे मतदानयंत्रेही कधी तरी नीट चालली नाहीत, असे होऊ शकते; पण त्यात मुद्दाम कोणी घोटाळा करू शकत नाही, याची आयोगास ठाम खात्री आहे. ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, फारुख अब्दुल्ला, शरद पवार व राज ठाकरे यांच्यासह अनेक विरोधी पक्षांनी ‘ईव्हीएम’बद्दल शंका घेणे सुरूच ठेवल्यानंतर अरोरा यांनी पुन्हा पूर्वीप्रमाणे मतपत्रिकेने मतदान घेणे अशक्य असल्याचे काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते. (वृत्तसंस्था)
निवडणूक कर्मचाऱ्यांचे कष्ट आणि समर्पण भावनेचे सर्व जण कौतुक करतात. आयोगाचे कर्मचारी हे सामान्य लोकांचे रक्षक असतात. राज्य सरकारकडून त्रास दिला जात असेल तर ते तुमचे रक्षण करतील.
-सुनील अरोरा,
मुख्य निवडणूक आयुक्त