मी बाहरी, मग सोनिया गांधी कोण? - मोदींचा नितिशकुमारांना सवाल
By admin | Published: October 30, 2015 12:54 PM2015-10-30T12:54:35+5:302015-10-30T13:51:36+5:30
बिहार ज्या अविभाज्य घटक आहे त्या भारताचा पंतप्रधान बाहरी असेल तर मग तुमचा प्रचार करणा-या महागठबंधनमधल्या सोनिया गांधी कोण आहेत असा सवाल विचारत नरेंद्र मोदींनी
Next
>
ऑनलाइन लोकमत
मुझफ्फरपूर (बिहार), दि. ३० - बिहार ज्या अविभाज्य घटक आहे त्या भारताचा पंतप्रधान बाहरी असेल तर मग तुमचा प्रचार करणा-या महागठबंधनमधल्या सोनिया गांधी कोण आहेत असा सवाल विचारत नरेंद्र मोदींनी बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या चौथ्या फेरीच्या प्रचारसभेत नितिशकुमारांवर टीकेची राळ उठवली. लालूप्रसाद यादव यांना तर न्यायालयाने दोषी ठरवलंय आणि नितिशकुमारांचे मंत्री कॅमे-यामध्ये लाच खाताना रंगेहाथ पकडले गेले आहेत, या दोघांवर नितिशकुमारांनी काय कारवाई केली हे सांगावं अशी मागणीही मोदींनी केली. बिहार हा प्रचंड मोठ्या खड्यात पडलेला असून त्याला बाहेर काढण्यासाठी एक नाही दोन इंजिनांची गरज असल्याचे सांगताना केंद्रातल्या भाजपा सरकारच्या इंजिनाबरोबरच राज्यातही भाजपाला निवडून देऊन दुसरं इंजिन भाजपाचंच आणावं अशी मागणी मोदींनी मतदारांकडे केली.
मोदींच्या भाषणातील मुख्य मुद्दे:
- बिहार इतक्या मोठ्या खड्ड्यात पडलाय की एका इंजिननं तो बाहेर येणार नाही तर केंद्र सरकार व राज्य सरकार अशा दोन्ही इंजिनांची गरज आहे.
- आम्हाला तांत्रिकांची नाही लोकतंत्राची गरज आहे. आपल्याला तावीज नको लॅपटॉप पाहिजे. त्यामुळे मी केवळ विकासाच्या मुद्यावर तुमच्याकडे मत मागत आहे.
- बिहारमधल्या वेगवेगळ्या भागामध्ये केंद्र सरकार किती शेकडो कोटी रुपये खर्च करणार आहे याची यादीच नरेंद्र मोदींनी वाचून दाखवली आणि केवळ विकास हाच सगळ्यावर उपाय आहे.
- पूर्वेकडील राज्यांना मुख्य धारेत आणण्याचा व विकास करण्याचा आमचा प्रयत्न आहे, त्यामुळे एकूण १ लाख ६५ हजार कोटी रुपये बिहारच्या विकासासाठी खर्च करण्याचे आम्ही ठरवलं आहे.
- भारताला आपल्याला यशाच्या शिखरावर न्यायचं आहे, परंतु भारताच्या पश्चिम भागाप्रमाणे पूर्वेचा विकास होणं आवश्यक आहे. त्यामुळे पूर्वेकडील भारतालाही पुढे जावं लागेल.
- वीज, पाणी आणि रस्ते ही बिहार राज्यासाठी माझी त्रिसूत्री आहे.
- बिहारमध्ये पाणी भरपूर आहे, परंतु दरवर्षी ४०० कोटी रुपये अन्य राज्यांतून मासे आणण्यासाठी खर्च केले जातात यासारखं दुर्दैव नाही.
- आम्ही भूतान व नेपाळमध्ये पाण्यापासून उर्जानिर्मितीचे प्रकल्प करण्याचे निर्णय घेतले ती वीज आम्ही बिहारला देणार आहोत. केवळ वीजेमुळे बिहारचं चित्र आमूलाग्र बदलेल.
- बिहारमधल्या एकेक जिल्ह्याला वीजेसाठी ३०० ते ३५० कोटी रुपये देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे.
- मुलांना स्वस्तात स्वस्त व चांगलं शिक्षण, तरूणांना रोजगार मिळण्यासाठी उद्योग, गावागावांमध्ये २४ तास वीज ही आमची उद्दिष्ट्य आहेत.
- बिहारसाठी माझ्याकडे त्रिसूत्री कार्यक्रम आहे. शिक्षण, रोजगार व आरोग्य असा कार्यक्रम माझा बिहारच्या जनतेसाठी आहे.
- बिहारमधला नौजवान रोजगारासाठी देशभर जातो आणि अपमानास्पद राहतो ही मजबुरी कुणी निर्माण केली असं विचारत बिहारमधून पलायन बंद व्हायला हवं.
- नितिशकुमारांचे मंत्री लाखो रुपयांची लाच घेताना कॅमे-यामध्ये पकडले गेले, लालूप्रसाद यादव यांना तर न्यायालयाने दोषी ठरवले आहे, परंतु त्यांची घरं नितिशकुमारांनी जप्त केली आहेत का असं विचारत नरेंद्र मोदींनी ईमानदारीची गरज व्यक्त करत भाजपाला मत देण्याची मागणी केली.
- माझ्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप आत्तापर्यंत झालेला नाही, मी गरीबांसाठी काम करत आहे. असं सांगत मी माझं वचन पूर्ण केलं की नाही असं विचारत नरेंद्र मोदी बिहारमधल्या निवडणुकांमध्ये अत्यंत आक्रमकपणे प्रचारात उतरले असून त्यांच्या सभांनाही लाखोंच्या घरात गर्दी होत आहे.
- गरीबांना दिलासा देणारी दोन लाखाची विमा योजना अवघ्या वर्षाच्या १२ रुपयांमध्ये आम्ही आणली आणि बिहारमधल्या ७० लाख गरीबांनी त्याचा फायदा घेतला.
- गरीबांना सावकाराच्या जोखडापासून मुक्त करण्यासाठी मुद्रा बँक आम्ही सुरू केली आणि केवळ बिहारमधल्या गरीबांनी एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे घेऊन आपापले उद्योग वाढवले.
- गरीबांसाठी काम करेल असे सरकार आम्हाला बनवायचे आहे.
- बिहारच्या जनतेने काँग्रेसला २५ वर्ष सत्तेपासून दूर ठेवले, हीच जनतेची ताकद आहे.
- महाआघाडीच्या नेत्यांनी स्वत:च्या कमाईसाठी खूप काही केले, पण बिहारच्या विकासासाठी काहीच काम केलं नाही.
- या नेत्यांनी गेली ६० वर्ष बिहारवर राज्य केलं, त्यांनी त्यांच्या कामाचा हिशोब दिला का?
- आजचा तरूण जागा झाला आहे, जर त्यांनी सरकारल सत्ता दिली तर ते त्यांच्याकडून हिशोबही मागता. जे लोक जनतेच्या केलेल्या कामांचा हिशोब देत नाहीत, त्यांच्यापेक्षा अधिक उद्धट कोण असेल?
- माझ्यावर टीका करून, मला शिव्या देऊन दमलेले नीतिश कुमार आता बिहारच्या जनतेला शिव्या देत असून बिहारच्या जनतेचा केलेला हा अपमान त्यांना महागात पडेल.
- जसजसं जनतेचं भाजपावरील प्रेम वाढत जातं, तसतशी विरोधकांची भाषा तीव्र होत जाते. भाजपाच्या सभा यशस्वी ठरतात आणि विरोधकांची टीका-टिपण्णी वाढत जाते. पण आता त्यांच्या टीकेची पातळी खालावली आहे.
- मोदींच्या रॅलीत हजारोंच्या संख्येने येणारे लोक हे विकत आणलले असतात अशी टीका महाआघाडीच्या नेत्यांनी केली होती, त्याच विधानाचा दाखला देत मोदींनी बिहारमधील जनता त्यांना 'गरीब आणि विकाऊ' म्हटलेलं सहन करणार नाही, जनतेचा हा अपमान महागात पडेल, असे सुनावले.