टाटा समूहात बॉस कोण ? कर्मचा-यांचा गोंधळ
By admin | Published: November 3, 2016 11:55 AM2016-11-03T11:55:57+5:302016-11-03T11:55:57+5:30
टाटा समूहाच्या चेअरमनपदावरुन सायरस मिस्त्री यांना हटवल्यानंतर टाटा समूहात पहिल्यांदा गोंधळाची स्थिती निर्माण झालेली नाही.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३ - टाटा समूहाच्या चेअरमनपदावरुन सायरस मिस्त्री यांना हटवल्यानंतर टाटा समूहात पहिल्यांदा गोंधळाची स्थिती निर्माण झालेली नाही. यापूर्वी ९० च्या दशकात रुसी मोदी यांनी टाटा स्टीलच्या बोर्डावर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच अजित केरकर यांनी ताज ग्रुपच्या हॉटेल्सवर वर्चस्व मिळवण्यासाठी टाटा समूहाला आव्हान दिले होते.
रतन टाटा यांची त्यावेळी टाटा सन्सच्या चेअरमनपदावर निवड झाल्यानंतर हा संघर्ष अधिक तीव्र झाला होता. पण त्यावेळचा संघर्ष आणि आता सायरस मिस्त्री यांना हटवल्यानंतरचा संघर्ष खूप वेगळा आहे. मोदी आणि केरकर यांच्याकडे जे अस्त्र नव्हते ते मिस्त्री यांच्याकडे आहे. सायरस मिस्त्री यांच्या कुटुंबाचा टाटा सन्समध्ये १८.५ टक्के हिस्सा आहे.
मोदी आणि केरकर स्टील आणि हॉटेलपुरता मर्यादीत होते पण सायरस मिस्त्री टीसीएस, टाटा स्टील, टाटा मोटर्स, इंडियन हॉटेल्स या समूहातील बडया कंपन्यांच्या चेअरमनपदावर आहेत तसेच अनेक कंपन्यांचे संचालक आहेत. रतन टाटा यांनी अलीकडेच समूहातील बडया कंपन्यांच्या प्रमुखांबरोबर चर्चा केली. त्यावेळी सायरस मिस्त्री समूहातील कंपन्यांच्या बोर्डावर असल्याकडे त्यांनी टाटांचे लक्ष वेधले. त्यावर आपण अजून मिस्त्रींबरोबर याबद्दल चर्चा केली नसल्याचे टाटांनी उत्तर दिले.
बहुमत असल्यामुळे सायरस मिस्त्री यांना हटवून त्यांच्या जागी नव्या चेअरमनची निवड करणे सोपे आहे पण समूहातील सर्व कंपन्यांच्या संचालक मंडळावरुन त्यांना हटवणे शक्य नाही कारण त्याला शेअरहोल्डरची परवानगी लागेल.