हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2024 06:13 AM2024-10-06T06:13:04+5:302024-10-06T06:14:17+5:30
हरयाणामध्ये विधानसभा निवडणूक रिंगणात १०३१ उमेदवार असून, त्यामध्ये १०१ महिला व ४६४ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.
चंडीगड : हरयाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी होत असलेल्या निवडणुकांत शनिवारी (दि. ५) संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे ६१ टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. हिंसाचाराच्या काही तुरळक घटना वगळता बहुतांश राज्यात मतदान शांततेत पार पडले. त्या राज्यात भाजप तिसऱ्यांदा सत्तेवर येणार की काँग्रेस भाजपचा पराभव करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हरयाणा, जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकांची ८ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहेत.
हरयाणामध्ये मागील दहा वर्षे भाजपची सत्ता आहे. तिथे आमचाच पक्ष पुन्हा विजयी होणार असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या अन्य दिग्गज नेत्यांना निवडणूक प्रचारात केला होता, तर यावेळी भाजपचा दणदणीत पराभव करून आम्ही सत्तेवर येऊ असा दावा काँग्रेसच्या नेत्यांनी केला. हरयाणातील विधानसभा निवडणुकांत शनिवारी शांततेेने मतदान पार पडले.
निवडणूक रिंगणात १०३१ उमेदवार
- हरयाणामध्ये विधानसभा निवडणूक रिंगणात १०३१ उमेदवार असून, त्यामध्ये १०१ महिला व ४६४ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.
- हरयाणात शनिवारी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ झाला व ही प्रक्रिया संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुरू होती.
मुख्यमंत्री सैनी यांची काँग्रेसवर टीका
- भाजपचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी हे कुरुक्षेत्र विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असून, त्यांनी अंबाला जिल्ह्यातील मिर्झा येथे मतदान केले. त्यानंतर त्यांनी सांगितले की, काँग्रेसने मागासवर्गाचा कायम अपमान केला आहे. त्यांच्या कल्याणासाठी एकही योजना अमलात आणली नाही.