देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेली दिशा रवी नेमकी आहे कोण? तिचा ग्रेटा थनबर्गशी काय संबंध? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 12:24 PM2021-02-15T12:24:42+5:302021-02-16T17:08:46+5:30
Disha Ravi Arrest: दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राईमकडून 'टूलकिट' प्रकरणी दिशाला अटक; पाच दिवसांची पोलीस कोठडी
नवी दिल्ली: गेल्या अडीच महिन्यांपासून कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन (Farmers Protest) सुरू आहे. या आंदोलनासंबंधीचं टूलकिट शेअर केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी २२ वर्षांच्या दिशा रवीला (Disha Ravi Arrest) अटक केली. दिशा हवामान बदलांसंदर्भात काम करते. दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राईम विभागानं दिशाला रविवारी बंगळुरूतून अटक केली.
पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या ग्रेटा थनबर्गसोबत दिशा रवीनं शेअर टूलकिट डॉक्युमेंट शेअर केलं होतं, असा दिल्ली पोलिसांचा आरोप आहे. २६ जानेवारीला दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मार्चदरम्यान हिंसाचार झाला. त्या कटात दिशाचा सहभाग होता. ती या कटाच्या प्रमुख सूत्रधारांपैकी एक असल्याचा आरोपदेखील पोलिसांनी केला आहे. 'दिशानं यासाठी एक व्हॉट्स ऍप ग्रुप तयार केला होता. या माध्यमातून तिनं टूलकिट तयार केलं,' अशी माहिती पोलिसांनी ट्विट करून दिली. या ग्रुपमधील सगळे जण खलिस्तानचं समर्थन करणाऱ्या पोएटिक जस्टिस संस्थेच्या संपर्कात होते, असा दावादेखील पोलिसांनी केला आहे.
"एका निशस्त्र तरुणीला बंदूकवाले घाबरले", दिशाच्या अटकेवर प्रियंका गांधी कडाडल्या
दिशा रवी आहे तरी कोण? तिचा ग्रेटा थनबर्गशी संबंध काय?
दिशा रवी २२ वर्षांची आहे. बंगळुरूतल्या माऊंट कॅर्मेल महाविद्यालयातून तिनं पदवी घेतली आहे. हवामान विषयावर काम करणाऱ्या 'फ्रायडे फॉर फ्युचर' संस्थेत दिशाचा सहभाग आहे. या संस्थेची स्थापना ग्रेटा थनबर्गनं २०१८ मध्ये केली. या संस्थेची भारतीय शाखा दिशानं २०१९ मध्ये सुरू केली. या शाखेचं नेतृत्त्व दिशा करते.
"जर 22 वर्षांची विद्यार्थिनी देशासाठी धोका ठरत असेल तर भारताचा पाया नक्कीच डळमळीत झालाय"
हवामान बदलासंदर्भात दिशानं देशभरात अनेक उपक्रम राबवले आहेत. हवामान बदलाविषयी दिशानं बंगळुरूत अनेक आंदोलनं केली आहेत. हवामान बदलाचे पर्यावरणावर होणारे प्रतिकूल परिणाम याबद्दल दिशानं जगभरातील अनेक माध्यमांमध्ये लिखाण केलं आहे.
दिशाला कोणामुळे मिळाली प्रेरणा?
हवामान बदल, पर्यावरण याबद्दल काम करण्याची प्रेरणा दिशाला आजी आजोबांकडून मिळाली. दिशाचे आजी आजोबा शेतकरी आहेत. हवामानातील बदलांचा फटका त्यांच्या शेतीला बसतो. त्यामुळेच या विषयावर काम करण्याचा निर्णय दिशानं घेतला.
दिशावर कोणकोणते गुन्हे दाखल?
दिशाविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. द्वेष भावना निर्माण करण्यासाठी कारस्थान रचल्याचा गुन्हादेखील तिच्याविरोधात नोंदवला गेला आहे. दिशाला रविवारी (काल) अटक करण्याक आली. तिला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. न्यायालयानं तिला पाच दिवसांची कोठडी सुनावली.