पराभवासाठी नेमके जबाबदार कोण? नड्डा पंतप्रधानांना अहवाल देणार; केंद्रीय नेतृत्व स्थानिक नेत्यांच्या उत्तरांवर असमाधानी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 07:10 AM2023-05-17T07:10:55+5:302023-05-17T07:11:29+5:30
भाजपच्या सूत्रांनी पुष्टी केली की, निवडणूक व्यवस्थापनातील अशा अनेक त्रुटी वारंवार समोर आल्या आहेत, ज्याबद्दल पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने सतर्क केले होते.
नवी दिल्ली : कर्नाटकमधील मानहानिकारक पराभवाचा अहवाल भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर करणार आहेत. पक्ष सध्या हा पराभव सामूहिक जबाबदारी म्हणून घेणार नाही, तर खरा दोषी निश्चित करून त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे.
भाजपच्या सूत्रांनी पुष्टी केली की, निवडणूक व्यवस्थापनातील अशा अनेक त्रुटी वारंवार समोर आल्या आहेत, ज्याबद्दल पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने सतर्क केले होते. येडियुरप्पा यांची मुख्यमंत्री पदावरून हकालपट्टी, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना मोकळीक न देणे, तिकीट वाटपात समस्या आणि नेत्यांमधील भांडणे, या समस्या सोडविण्याची जबाबदारी असलेल्या पथकाने त्रुटी किंवा भेडसावणाऱ्या समस्या शीर्ष नेतृत्वाला सांगितल्या नाहीत.
जेडीएसच्या मतांमध्ये घट झाल्याचा फायदा भाजपला का मिळाला नाही, असा प्रश्न केंद्रीय नेतृत्वाने विचारला आहे. लिंगायत मतांची विभागणी कशी झाली आणि तटीय कर्नाटकमध्ये भाजपला मागील कामगिरीची पुनरावृत्ती का करता आली नाही? याबाबत स्थानिक विभागाकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही.
भाजपचे दक्षिणचे स्वप्न भंगले
कर्नाटकातील पराभवाने भाजपच्या मिशन दक्षिणच्या पायाला तडा गेला आहे. देशाच्या राजकारणात दक्षिणेकडील ५ राज्यांचा (कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, आंध्र आणि तेलंगणा) वाटा सुमारे २२-२४ टक्के आहे. दक्षिण भारतात विधानसभेच्या ९०० आणि लोकसभेच्या १३० जागा आहेत. भाजपकडे सध्या दक्षिणेतून २९ खासदार आहेत आणि त्यांनी यावेळी लोकसभेच्या ६० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
द्वेष निर्माण करणारे कारखाने अतिसक्रिय : काँग्रेस
- भाजप जेव्हा निवडणुका हरतो तेव्हा तो लज्जास्पद असतो, त्यांचे द्वेष निर्माण करणारे कारखाने अतिसक्रिय झाले आहेत. सामाजिक सलोखा बिघडवण्याचा ते प्रयत्न करत आहेत, असा आरोप काँग्रेसने भाजपवर केला आहे.
- कर्नाटक वक्फ बोर्डाचे प्रमुख शफी सादी यांनी राज्यात मुस्लीम उपमुख्यमंत्रिपदाची नियुक्ती करावी, अशी मागणी केली आहे. शफी सादी यांच्या या मागणीचा हवाला देत भाजपने काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी हा पलटवार केला आहे.