"कुणामध्ये एवढी हिंमत झाली आहे जो उद्धव ठाकरेंना अयोध्येत येण्यापासून रोखेल"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 01:29 PM2020-09-14T13:29:05+5:302020-09-14T13:55:17+5:30
कंगनावर कारवाई करणाऱ्या उद्धव ठाकरेंना श्रीरामजन्मभूमी असलेल्या अयोध्येमध्ये येऊ देणार नाही, असा पवित्रा काही संतांनी घेतला होता
अयोध्या - सध्या सिनेअभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या वादामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. त्यातच कंगनावर कारवाई करणाऱ्या उद्धव ठाकरेंना श्रीरामजन्मभूमी असलेल्या अयोध्येमध्ये येऊ देणार नाही, असा पवित्रा काही संतांनी घेतला होता. दरम्यान, या वादात आता श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमचे सरचिटणीस असलेल्या चंपत राय यांनी उडी घेतली आहे. कुणामध्ये एकढी हिंमत झाली आहे जो उद्धव ठाकरेंना अयोध्येत येण्यापासून रोखेल, असे सांगत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधकांना खडेबोल सुनावले आहेत.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास आणि ड्रग्स रॅकेटच्या मुद्द्यावरून कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यात आरोप प्रत्यारोप होऊन वाद विकोपाला गेला होता. त्यानंतर कंगनाने आपण मुंबईत येत असून हिंमत असेल तर मला रोखून दाखवा असे आव्हान शिवसेनेला दिले होते. तसेच शिवसेनेवर आरोप करताना मुंबईला पीओकेची उपमा दिली होती. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकाम तोडले होते. या कारवाईविरोधात अनेकांनी टीका केली होती. अयोध्येमधील साधूसंतांनीही या कारवाईला विरोध करत उद्धव ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला होता. दरम्यान, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव असलेल्या चंपत राय यांनी उद्धव ठाकरेंना समर्थन दिले आहे.
चंपत राय म्हणाले की, कुणामध्ये एवढी हिंमत झाली आहे की जो उद्धव ठाकरेंचा सामना करणार आहे, तेही अयोध्येमध्ये. कुणाच्या आईने एवढं जिरं खाल्लंय कि तिचा मुलगा एवढा शक्तिशाली जन्मला आहे जो गंगेला रोखून दाखवेल. कुणाच्या आईंच असं अपत्य आहे जो उद्धव ठाकरेंना अयोध्येत येण्यापासून रोखून दाखवेल.
कंगनाला समर्थन देत अनेक साधूसंतांनी केला होता उद्धव ठाकरेंना विरोध
कंगनाच्या मुंबईतील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर मुंबई महानगरपालिकेने करवाई केल्यानंतर या प्रकरणी आता विश्व हिंदू परिषदेनं कंगनाची बाजू घेतली होती. अयोध्येतील संतांनीही कंगनाचं समर्थन करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला होता. "उद्धव ठाकरेंनी अयोध्येला येऊ नये. यापुढे अयोध्येत उद्धव ठाकरेंचं स्वागत नाही तर तीव्र विरोध होणार" असल्याचं त्यांनी म्हटलं होते.
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी कंगनाला देशाची मुलगी म्हटलं असून उद्धव ठाकरेंना अयोध्येत न येण्याचा सल्लावजा इशारा दिला. हनुमान गढी मंदिराचे पुजारी महंत राजू दास यांनी कंगनाच्या कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईचा विरोध केला होता. तसेच कार्यालय तोडून चांगलं केलं नाही असं म्हटलं होतं.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले
शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी