‘अलीगढ के ताले की’ चावी कुणाकडे? भाजपने दोन विद्यमान आमदारांचा पत्ता केला कट, सपा-रालोदने कसली कंबर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 12:59 PM2022-02-07T12:59:07+5:302022-02-07T13:00:06+5:30
अलिगढच्या कुलुपाला १३० वर्षे जुन्या इतिहासाची किनार आहे. एकट्या अलिगढ शहरात पाच हजारांहून अधिक कारखाने असून, दोन लाखांहून अधिक कारागिरांचा रोजगार त्यावर चालतो म्हणूनच प्रत्येक निवडणुकीत हे कुलूप चावीचा शोध घेत असते.
गजानन चोपडे -
अलीगढ : देशातच नव्हे तर विदेशातही जेथील कुलुपांचा बोलबाला आहे त्या कुलुपाची चावी यंदाच्या निवडणुकीत कुणाकडे आहे, या प्रश्नाचे उत्तर खुद्द कुलुपांची निर्मिती करणाऱ्यांना अर्थात स्वतः रिंगणात असलेल्यांनाही ठाऊक नाही. होय, जगभरात प्रसिद्ध लिंक लॉकचे जफर आलम अलिगढमधून नशीब आजमावत आहेत.
अलिगढच्या कुलुपाला १३० वर्षे जुन्या इतिहासाची किनार आहे. एकट्या अलिगढ शहरात पाच हजारांहून अधिक कारखाने असून, दोन लाखांहून अधिक कारागिरांचा रोजगार त्यावर चालतो म्हणूनच प्रत्येक निवडणुकीत हे कुलूप चावीचा शोध घेत असते.
भाजपने या निवडणुकीत सुमारे २० टक्के वर्तमान आमदारांचा पत्ता साफ केला. यात अलिगढच्या सात जागांपैकी दोन जागांवर नवे उमेदवार देण्यात आले. वर्तमान आमदार संजीव राजा यांना भाजपने तिकीट नाकारले असून, त्यांच्या पत्नी मुक्ता राजा यांना उमेदवारी बहाल केली आहे. २२ वर्षे जुन्या एका प्रकरणात न्यायालयाने संजीव राजा यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे भाजपने आपली स्वच्छ प्रतिमा दाखविण्यासाठी संजीव राजा यांना डच्चू दिला खरा, पण त्यांच्याच पत्नीला उमेदवारी दिल्याने हा डॅमेज कंट्रोल किती प्रभावी ठरेल, हे भाजप नेतेही सांगू शकत नाही.
दुसरीकडे लिंक लॉक्सचे जाफर आलम पुन्हा एकदा सायकलवर स्वार होत भाजपच्या घरालाच कुलूप लावायला निघाले आहेत. कुलूप यासाठी कारण या शहराला कुलुपाचाच इतिहास आहे. दर तीन घराआड कुलूप बनविण्याचे काम येथे चालते. खरे तर येथील अर्थव्यवस्था याच कुलुपावर आधारित आहे. उघडपणे दिसत नसला तरी कुलुपाचा मुद्दा अंडर करंट देत आहे. समाजवादी पार्टीचे जाफर आलम स्वतः या व्यवसायातील दिग्गज असल्यामुळे योगी सरकारच्या धोरणावर वार करण्याची कुठलीही संधी ते सोडत नाही.
लिंक ताले आसानीसे नही खुलते
तसे लिंक कुलूप सहजासहजी उघडत नसल्याचा दावा केला जातो. मात्र, यंदा हे कुलूप स्वतः जाफर यांना सहज उघडता येईल का, असा खोचक प्रश्न भाजप कार्यकर्त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना उपस्थित केला.
मुजफ्फरनगरमध्ये टिकैत तळ ठोकून
उत्तर प्रदेशच्या पहिल्या टप्प्य़ातील निवडणुकीसाठी १० फेब्रुवारीला ५८ जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये पश्चिम उत्तर प्रदेशमधल्या ११ जिल्ह्यातल्या जागांचा समावेश आहे. या टप्प्यासाठी बहुतेक सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार दिले आहेत. प्रचाराळा धुराळा उडविला जात असताना बहुसंख्य मतदारांनी मौन धारण केल्याने यूपीचे सत्ताशकट कुणाच्या हाती येणार, याबाबत कुणीही निश्चितपणे सांगण्यास पुढे धजावत नाही.
विशेष म्हणजे जनमत चाचण्यांमध्येही मतदार बोलायला तयार नसल्याने योगी सरकार पुन्हा सत्ता सांभाळेल, की अखिलेश यादवांची जादू चालेल, याबाबत केवळ ठोकताळे व्यक्त केली जात आहेत.