तो फुटलेला उमेदवार कोण?
By admin | Published: November 14, 2016 02:31 AM2016-11-14T02:31:20+5:302016-11-14T02:31:20+5:30
खोर ग्रामपंचायत : गावभर चर्चेला आले उधाण
Next
ख र ग्रामपंचायत : गावभर चर्चेला आले उधाणखोर : येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. मात्र एक उमेदवाराच्या फुटीमुळे मोठी राजकीय उलथापालथ पाहावयास मिळाल्याने खोर गावामध्येच नव्हे तर संपूर्ण दौंड तालुक्यामध्ये हा फुटलेला उमेदवार कोण? असा प्रश्न उभा राहिला गेला आहे.यापूर्वी सन २०१४ ला झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार थोरात गटाचे सहा तर आमदार राहुल कुल गटाचे पाच उमेदवार विजय झाले होते. त्या वेळी कुल गटाचे उमेदवार पांडुरंग डोंबे यांचा एका मताने पराभव झाला होता. एका मतामुळे ही ग्रामपंचायत माजी आमदार रमेश थोरात यांच्या गटाच्या ताब्यात होती. पहिल्या वर्षी थोरात गटाचे रामचंद्र चौधरी हे सरपंचपदी विराजमान झाले होते. ठरलेल्या निर्धारित कालावधीमुळे रामचंद्र चौधरी यांनी आपल्या सरपंचपदाचा काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. त्यामुळे सरपंचपद रिक्त होते. या रिक्त जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. सरपंचपदासाठी थोरात गटाचे मारुती धोंडीबा चौधरी तर कुल गटाचे सुभाष विठ्ठल चौधरी व शिवाजी हिरामण पिसे यांनी अर्ज दाखल केले होते. निर्धारित वेळेत शिवाजी हिरामण पिसे यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने थोरात गटाचे मारुती धोंडीबा चौधरी व कुल गटाचे सुभाष विठ्ठल चौधरी यांचे दोघांचे सरपंचपदासाठी अर्ज राहिले. या वेळी झालेल्या गुप्त मतदान पद्धतीने मतदानात सरपंचपदी कुल गटाचे सुभाष विठ्ठल चौधरी यांना अटीतटीच्या लढतीत ६ मते मिळाली, तर थोरात गटाचे मारुती धोंडीबा चौधरी यांना ५ मते मिळाली. या निवडणुकीत मारुती चौधरी यांचा कुल गटाच्या सुभाष विठ्ठल चौधरी यांनी १ मताने पराभव करीत अनपेक्षित विजय संपादन करीत ग्रामपंचायतीवर झेंडा फडकाविला. या विजयामुळे थोरात गटाचा एक सदस्य फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. हा फुटलेला सदस्य कोण याची खमंग चर्चा सध्या तालुकाभर सुरू आहे.खोर ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आले होते. मात्र, त्यांनीदेखील भर सभेत आपल्या भाषणातून सांगितले होते की, ही थोरात गटाची सत्ता ही काठावरची आहे. सरपंच जरा जपून बरं का? असा मिस्कील शब्दांत टोला लगावला होता. मात्र, सध्याची स्थिती तशीच होऊन बसली आहे. माजी सरपंच रामचंद्र चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि आमदार राहुल कुल गटाने उमेदवार फोडण्याबाबतचे सर्जिकल स्ट्राइक चालू केले. उमेदवार फोडून सत्ता उलथापालथ होऊन तब्बल चार वर्षे खोर ग्रामपंचायतीची सत्ता ही कुल गटाकडे आली आहे. मात्र, फुटलेल्या उमेदवाराची चर्चा विसरायला गाव काही तयार नाही, अशी गत सध्या होऊन बसली आहे.चौकट ..... माजी आमदार रमेश थोरात यांच्या आग्रहाखातर खोर हे गाव नुकतेच राष्ट्रवादीच्या राज्यसभेतील खासदार वंदना चव्हाण यांनी आदर्श सांसद ग्राम म्हणून दत्तक घेतले आहे. आज झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या ताब्यातून ही ग्रामपंचायत कुल गटाकडे गेल्याने राष्ट्रवादीपुढे नामुष्की ओढवली आहे.