‘अहिरां’च्या गडात कोणाला अहेर? AAP च्या सीएमपदाच्या गढवींना कोणाचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 10:48 AM2022-11-30T10:48:13+5:302022-11-30T10:52:54+5:30
‘आप’चे सीएम पदाचे उमेदवार रिंगणात; काँग्रेस जागा वाचवणार?
कमलेश वानखेडे
खंबाडिया( द्वारका) : आम आदमी पार्टीने मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट केलेले पत्रकार इसुदान गढवी हे द्वारका जिल्ह्यातील खंबाडिया या मतदारसंघात झाडू घेऊन उतरले आहेत. सुमारे दोन दशके भाजपचा गड राहिलेला हा मतदारसंघ गेल्या निवडणुकीत काँग्रेसने जिंकला. अहिर समाजाचे एकतर्फी प्राबल्य असलेला हा मतदारसंघ काबीज करण्यासाठी गढवी समाजातून येणाऱ्या इसुदान यांना बरीच कसरत करावी लागत आहे.
या मतदारसंघात १९७२ पासून अहिर समाजाचा उमेदवारच जिंकत आला आहे. त्यामुळे काँग्रेस व भाजप दोन्ही पक्षांनी पुन्हा एकदा अहिर समाजालाच उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने विद्यमान आमदार विक्रम माडम यांना तिकीट दिले. यापूर्वी ते खासदार म्हणूनही विजयी झाले होते. भाजपने येथे नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना कॅबिनेट मंत्री राहिलेले मुळुभाई बेरा यांना संधी दिली आहे. बेरा हे यापूर्वी दोनदा पराभूत झालेले आहेत.
सौराष्ट्रच्या इतर जागांच्या तुलनेत या जागेवर भाजप कमजोर दिसत आहे. आम आदमी पार्टीचे उमेदवार इसुदान गढवी हे शेतकऱ्यांमध्ये व ग्रामीण भागात खूप लोकप्रिय आहेत. पत्रकार म्हणून त्यांनी उचललेले प्रश्न आजही जनतेच्या स्मरणात आहेत. त्यांच्या पाठीशी गडवी समाज भक्कमपणे उभा आहे. खंबालियाजवळील सलाया बंदर व भानवद तालुका या मुस्लिमबहुल भागात ते काँग्रेसच्या व्होट बँकला हात घालत आहेत. या भागातील तरुण मतदारही बऱ्यापैकी इसुदान यांच्याकडे झुकलेला दिसतो. त्यामुळे येथे काँग्रेसचे माडम यांच्याशी त्यांची ‘टफ फाइट’ आहे.
‘खाटला’ मीटिंगवर भर
nया मतदारसंघात राजकीय पारा चढलेला आहे. भाजपचा उघड व जोरात प्रचार सुरू आहे. आप व काँग्रेसने मात्र ‘खाटला’ मीटिंगवर भर दिला आहे.
nदोन्ही पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते गावागावांत जाऊन एखाद्या घरी गावकऱ्यांची छोटी मीटिंग घेऊन त्यांना आपले मुद्दे पटवून देत आहेत.