Madhavi Latha: ओवेसींविरोधात भाजपाकडून महिलेला उमेदवारी; कोण आहेत माधवी लता? त्यांच्याबद्दल जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 05:21 PM2024-03-03T17:21:21+5:302024-03-03T17:23:13+5:30
Madhavi Latha : डॉ. माधवी लता विरिंची हॉस्पिटलच्या अध्यक्षा आहेत.
Madhavi Latha: (Marathi News) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. कालच भाजपाने आपल्या एकूण १९५ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यानुसार, तेलंगणामधील चर्चेत असलेल्या हैदराबादच्या जागेवर कोम्पेला माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे. सध्या या जागेवर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी खासदार आहेत.
हैदराबाद मतदार संघाची जागा १९८४ पासून ओवेसी कुटुंबाच्या ताब्यात आहे. हैदराबाद हा मतदार संघ ओवेसींचा बालेकिल्ला मानला जातो. असदुद्दीन ओवेसी यांचे वडील सुल्तान सलाउद्दीन ओवेसी १९८४ मध्ये पहिल्यांदा या जागेवरून खासदार झाले. २००४ पर्यंत ते खासदार राहिले आणि त्यानंतर आता ही जागा असदुद्दीन ओवेसी यांच्याकडे आहे.
जाणून घ्या, माधवी लता यांच्याविषयी...
- डॉ. माधवी लता विरिंची हॉस्पिटलच्या अध्यक्षा आहेत. त्या सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. तसेच, अनेकदा हिंदुत्वासाठी त्या आवाज उठवताना दिसून येतात.
- हॉस्पिटलच्या अध्यक्षा असण्यासोबतच माधवी लता या भरतनाट्यम नृत्यांगना देखील आहेत.
- हैदराबादमध्ये सामाजिक कार्यासाठीही त्या ओळखल्या जातात. त्या ट्रस्ट आणि संस्था आरोग्यसेवा, शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच, माधवी लता या लोपामुद्रा चॅरिटेबल ट्रस्ट आणि लतामा फाउंडेशनच्या प्रमुख आहेत.
- माधवी लता यांनी कोटी महिला कॉलेजमधून राज्यशास्त्रात एमए केले. सध्या त्यांची हिंदू धर्मासंबंधीची भाषणे लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.
- यापूर्वी पक्षाने भागवत राव यांना उमेदवारी दिली होती. मात्र, भागवत यांना ओवेसींकडून सुमारे तीन लाख मतांनी पराभव स्वीकारावा लागला. यानंतर आता हैदराबादमध्ये पहिल्यांदाच भाजपाने महिला उमेदवार रिंगणात उतरविला आहे.
- यंदाच्या लोकसभा निवडणुकीत हैदराबादमध्ये भाजपाने महिला उमेदवार उभे करून लढत चुरशीचा करण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र ओवेसी यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात पराभूत करणे सोपे जाणार नाही. आता ओवेसींच्या बालेकिल्ल्यात हिंदुत्वाचा चेहरा विजयी होणार की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.