मसरत आलम भट्ट नक्की कोण? ज्याच्यामुळे 'मुस्लीम लीग जम्मू काश्मीर'वर घातली बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 06:17 PM2023-12-27T18:17:35+5:302023-12-27T18:20:06+5:30
या संघटनेवर बंदी घातल्याची माहिती खुद्द गृहमंत्री अमित शाह यांनी दिली
Masrat Alam Bhatt Muslim League Jammu Kashmir: जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी आणि देशविरोधी कारवायांचे समर्थन केल्याच्या आरोपावरून केंद्रीय गृह मंत्रालयाने UAPA लागू केला. त्याअंतर्गत 'मुस्लिम लीग जम्मू काश्मीर (मसरत आलम गट)/MLJK-MA वर बंदी घातली. खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करून मुस्लिम लीग जम्मू-काश्मीरवर बंदी घालण्याची घोषणा केली. जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती बिघडवणाऱ्या घटकांसह संघटनांवरही बारीक नजर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आवश्यक तेथे असे घटक व संघटनांवर बंदी घालून परिस्थिती नियंत्रणात ठेवली पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले.
गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हा गट आणि या गटातील सर्व सदस्य जम्मू-काश्मीरमध्ये देशविरोधी कारवायांसह फुटीरतावादी कारवाया करत होते. ते दहशतवादाला पाठबळ देऊन जम्मू-काश्मीरमध्ये इस्लामिक राजवटीसाठी लोकांना तयार करायचे. मसरत आलम हा संघटनेचा मुख्य चेहरा आहे. त्याच्याबद्दल जाणून घेऊया.
अखेर मसरत आलम कोण आहे?
- मसरत आलमचा जन्म १९७१ मध्ये जैंदर मोहल्ला हब्बाकडल, श्रीनगर येथे झाला. तेव्हा काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती वाईट होती. मसरत २० वर्षांचा असताना तेथील परिस्थितीमुळे तो हिंसक विचारसरणीने मोठ्या प्रमाणात प्रभावित झाला आणि बंदूक धार्जिण्या संस्कृतीचा समर्थक झाला.
- मसरत आलम भटला तत्कालीन दहशतवादी कमांडर मुश्ताक अहमदचा सहकारी असल्याच्या कारणावरून बीएसएफने १९९० मध्ये श्रीनगरमध्ये पहिल्यांदा अटक केली होती.
- मसरतच्या सुटकेनंतर तो आजोबांच्या दुकानात काम करू लागला. त्याने काश्मीर विद्यापीठातून पदवीचे शिक्षणही पूर्ण केले.
- १९९९मध्ये, मसरत थेट ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फरन्समध्ये सामील झाला. ही संघटना फुटीरतावादी नेता सय्यद अली शाह गिलानी यांनी चालवली होती.
- हुर्रियत कार्यकर्ता झाल्याने मसरत आलमला प्रमुख फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांच्या मदतीने झटपट ओळख मिळाली.
- ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फरन्समध्ये सक्रिय सहभागामुळे मसरत अनेकवेळा तुरुंगात गेला. त्यामुळेच त्याचा मुस्लिम लीग जम्मू काश्मीर या गटाला ओळख मिळाली.
- २००८च्या मुंबई हल्ल्यातील मुख्य आरोपी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घोषित दहशतवादी हाफिज सईदचा मसरत समर्थक आहे.
- पाकिस्तान आणि आयएसआयच्या सूचनेनुसार मसरत ९० च्या दशकात मशिदींतील स्पीकरमधून विविध देशद्रोही आणि राष्ट्रविरोधी घोषणा करत होता आणि हाफिज सय्यदसारख्या वॉन्टेड दहशतवाद्याचे थेट कौतुकही करत होता.
- २०१०मध्ये मसरत आलम हा फुटीरतावादी चेहरा म्हणून उदयास आला. गिलानींनी सुरू केलेल्या “काश्मीर छोडो” मोहिमेत मसरतने महत्त्वाची भूमिका बजावली आणि निषेधाची स्वतंत्र कॅलेंडर जारी केली.
- २०१४ मध्ये मसरतने लष्कर आणि सुरक्षा दलांनी सामान्य लोकांना मदत करण्यावर आक्षेप घेतला होता. २०१५ मध्ये हुर्रियत नेते सय्यद गिलानी दिल्लीहून काश्मीरमध्ये आले तेव्हा मसरतने एका रॅलीत पाकिस्तानचा झेंडा फडकावला. त्यावर त्याला पुन्हा अटक करण्यात आली.
- पाकिस्तानने गिलानीना ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फरन्सच्या अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर उत्तराधिकारी मोहम्मद अशरफ सेहराईची पदावर नियुक्ती झाली. कोविडमुळे सेहराईचा मृत्यू झाल्यानंतर याचे नेतृत्व मसरत आलमकडे सोपवण्यात आले.
- विशेष म्हणजे मुस्लिम लीग मसरत गटावर आज बंदी घालण्याआधी, फुटीरतावादी नेते शाबीर अहमद शाह यांच्या जम्मू-काश्मीर डेमोक्रॅटिक फ्रीडम पार्टीवरही गृह मंत्रालयाने यूएपीए अंतर्गत बंदी घातली होती आणि या गटाच्या सर्व कारवाया देशविरोधी असल्याचे घोषित केले होते.