Jahnavi Das: कोण आहे प्रशांत किशोर यांची पत्नी? काय करतात काम?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 03:20 PM2024-08-26T15:20:49+5:302024-08-26T15:23:15+5:30
who is prashant kishor wife: राजकीय रणनीतीकार आणि जन सुराजचे संस्थापक प्रशांत किशोर यांच्या पत्नी जाह्नवी दास कोण आहेत आणि त्या काय करतात?
Prashant Kishor Wife Jahnavi Das: जन सुराजचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी बिहार विधानसभा निवडणुकीवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. निवडणुकीच्या तयारीला लागलेले प्रशांत किशोर बैठका आणि कार्यक्रम घेताना दिसत आहे. अशातच त्यांच्या पत्नी जाह्नवी दास या चर्चेत आल्या. असे काय घडले की जाह्नवी दास यांच्याबद्दल बोलले जात आहे आणि त्या काय करतात, याबद्दल जाणून घ्या.
जन सुराजने महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात प्रशांत किशोर यांनी आपल्या पत्नीची म्हणजे जाह्नवी दास यांची ओळख करून दिली. 'हिच्यामुळेच (जाह्नवी दास) चिंतामुक्त होऊन बिहारमध्ये पदयात्रा करू शकत आहे', प्रशांत किशोर पत्नीचे कौतुक करताना म्हणाले.
प्रशांत किशोर यांनी पहिल्यांदाच आपल्या पत्नीचा सार्वजनिक कार्यक्रमात परिचय करून दिल्याने जाह्नवी दास चर्चेत आल्या आहेत.
कोण आहेत जाह्नवी दास?
जाह्नवी दास या मूळच्या आसामच्या रहिवासी आहेत. त्या पेशाने डॉक्टर आहेत. प्रशांत किशोर आणि जाह्नवी दास यांची पहिली भेट संयुक्त राष्ट्र संघाच्या आरोग्यासंबंधीच्या अभियानादरम्यान झाली होती. सोबत काम करत असताना दोघे एकमेकांचे मित्र बनले.
पुढे दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले. नंतर दोघांनी लग्न करून संसार थाटला. दोघांना एक मुलगा आहे. सध्या जाह्नवी दास यांनी कामातून ब्रेक घेतला आहे. त्या प्रशांत किशोर आणि मुलासोबतच राहतात आणि कुटुंबाची सगळी जबाबदारी सांभाळतात.
पहिल्यांदाच समोर आल्या जाह्नवी दास
राजकीय रणनीतिकार म्हणून प्रशांत किशोर हे देशभरात परिचित आहे. पण, राजकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने जाह्नवी दास यांचे नाव पहिल्यांदाच चर्चेत आले आहे. जाह्नवी दास यांचे कौतुक करताना प्रशांत किशोर कार्यक्रमात म्हणाले की, "एक महिला कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असल्याने तुमचा भाऊ हे काम करू शकत आहे. तुमचे सहकार्य आहे म्हणून पुरूष काहीतरी चांगलं करू शकत आहेत."