कोण आहेत म्हैसूरचे खासदार प्रताप सिम्हा? ज्यांच्या पासद्वारे दोघांनी संसदेत प्रवेश केला अन् स्मोक कँडल फोडल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 04:21 PM2023-12-13T16:21:05+5:302023-12-13T16:29:07+5:30
Who Is Pratap Simha? ४२ वर्षीय प्रताप सिम्हा म्हैसूरचे (कर्नाटक) भाजप खासदार आहेत.
नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आठव्या दिवशी कामकाज सुरू असतानाच संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. संसदेच्या सुरक्षेच्या दाव्यांचा धुरळा उडवत लोकसभेच्या व्हिजिटर गॅलरीतून दोन तरुणांनी खाली उडी मारली. दरम्यान, दोन्ही आरोपींनी कर्नाटकचे खासदार प्रताप सिम्हा यांच्या संदर्भाने बनवलेल्या व्हिजिटर पासद्वारे संसदेत प्रवेश केल्याचे वृत्त आहे.
संसदेच्या कामकाजादरम्यान घुसलेल्या दोघांपैकी एकाचे नाव सागर असे आहे. त्याच्या दोन साथीदारांना संसदेबाहेर पकडण्यात आले. म्हणजे एकूण चार जण होते. ज्यांची चौकशी सुरू आहे. खासदार दानिश अली यांनी सांगितले की, ते दोघेही म्हैसूरचे भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्या नावाने लोकसभा व्हिजिटर पासवर आले होते. तर काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी म्हणाले, शून्य प्रहरात दोघांनी प्रेक्षक गॅलरीतून उडी मारली आणि त्यांनी काहीतरी फेकले, त्याद्वारे गॅस बाहेर पडत होता. त्यांना खासदारांनी पकडले. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
अशा परिस्थितीत खासदार प्रताप सिम्हा यांच्याविषयी माहिती जाणून घेऊया. ४२ वर्षीय प्रताप सिम्हा म्हैसूरचे (कर्नाटक) भाजप खासदार आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव बी.ई. हे गोपाळ गौडा आहे. त्यांची मतदार म्हणून ओळख २१५-चामुंडेश्वरी (कर्नाटक) मतदारसंघातील आहे. ते कन्नड भाषेतील वृत्तपत्रांत कॉलम (स्तंभलेखन) लिहितात. प्रताप सिम्हा पेशाने पत्रकार आहेत. तसेच, ते आपल्या हिंदुत्वाच्या राजकारणासाठी ओळखले जात असून भारतीय जनता पार्टी (भाजपा) कर्नाटकच्या युवा आघाडीचे अध्यक्ष आहेत.
प्रताप सिम्हा यांचा जन्म कर्नाटकातील सुंदर हिल स्टेशनपैकी एक असलेल्या सकलेशपूर येथे झाला. कर्नाटकातून प्रकाशित होणाऱ्या विजया कर्नाटक वृत्तपत्रात पत्रकार म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. 'बेट्टाले जगत्तु' या कॉलममुळे ते प्रसिद्धीझोतात आले होते. पुढे २००८ मध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर 'नरेंद्र मोदी: यारू थुलियादा हादी' (Narendra Modi: The Untrodden Road) नावाचे चरित्र लिहिले होते.
२०१४ मध्ये राजकारणात प्रवेश
प्रताप सिम्हा यांनी २०१४ मध्ये राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर कमी कालावधीत ते भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष बनले. त्यांनी २०१४ मध्ये म्हैसूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत ३२००० मतांच्या फरकाने त्यांच्या प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवला होता. याचबरोबर, ते प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्यही आहेत.