संजय राऊत कोण आहेत? रोजच टीका करणाऱ्यांना महत्व देत नाही; फडणवीसांचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 13:54 IST2022-05-19T13:54:14+5:302022-05-19T13:54:24+5:30
ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा म्हणजे भाजपाची २०२४ च्या निवडणुकीची तयारी असल्याची टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत कोण आहेत? रोजच टीका करणाऱ्यांना महत्व देत नाही; फडणवीसांचा खोचक टोला
नवी दिल्ली-
ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा म्हणजे भाजपाची २०२४ च्या निवडणुकीची तयारी असल्याची टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. याबाबत राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं असता त्यांनी कोण संजय राऊत? रोजच टीका करणाऱ्यांना मी महत्व देत नाही, असा टोला लगावला आहे. ते नवी दिल्लीत बोलत होते.
"संजय राऊत रोजच टीका करत असतात. त्यांना आम्ही महत्व देत नाही. ते कोण आहेत एवढे? ते काही महत्वाचे व्यक्ती नाहीत. त्यांच्या प्रश्नांना मी का उत्तर देऊ? तुमच्याकडे काही स्वत:चे प्रश्न असतील तर विचारा. त्यावर मी बोलेन", असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांच्या टीकेवर भाष्य करण्यास नकार दिला.
"ज्ञानवापीचा विषय आस्थेचा विषय आहे आणि असे विषय राजकारणाच्या पलीकडचे असतात. देशात हे विषय न्यायालयाच्या माध्यमातून सोडवले जातात. आज न्यायालयनं त्याठिकाणी कोर्ट-कमिश्नरची नियुक्ती केली आहे. त्यांचा जो रिपोर्ट येईल त्याआधारे कोर्ट निर्णय देईल. तो निर्णय अत्यंत महत्वाचा असेल. सध्या न्यायालयात हे प्रकरण असल्यानं त्यावर बोलणं योग्य ठरणार नाही", असंही फडणवीस यावेळी म्हणाले.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
"खरंतर विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवायला हवी. अयोध्येत राम मंदिर उभं राहिल्यावर आता अशाप्रकारचे प्रश्न सामोपचाराने सुटले पाहिजेत. पण ताजमहालच्या खाली काय आहे? जामा मशिदीच्या खाली काय आहे? यातच सगळा वेळ चालला आहे. पण महागाईवर कुणी बोलत नाही. बेरोजगारीवर कुणी बोलत नाही. फक्त मशीद, मंदिर आणि नावं बदलणं यावरच निवडणुका लढवल्या जात आहेत. ज्ञानवापी मशिदीचा वाद म्हणजे २०२४ च्या निवडणुकीची तयारी तर नाही ना? मशिदीत खोदकाम करण्यापेक्षा कैलास मानस पर्वत मिळवा", असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.