WFI चे नवे अध्यक्ष संजय सिंह कोण आहेत? ब्रिजभूषण सिंह यांच्याशी काय आहे कनेक्शन? जाणून घ्या....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 06:27 PM2023-12-21T18:27:57+5:302023-12-21T18:28:25+5:30

संजय सिंह यांनी प्रतिस्पर्धी अनिता शेओरान यांचा पराभव केला. 

Who is Sanjay Singh, new Wrestling Federation of India chief? Birj Bhushan Loyalist Sanjay Singh  | WFI चे नवे अध्यक्ष संजय सिंह कोण आहेत? ब्रिजभूषण सिंह यांच्याशी काय आहे कनेक्शन? जाणून घ्या....

WFI चे नवे अध्यक्ष संजय सिंह कोण आहेत? ब्रिजभूषण सिंह यांच्याशी काय आहे कनेक्शन? जाणून घ्या....

WFI New Chief Sanjay Singh  ( Marathi News ) : नवी दिल्ली :  गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाची  निवडणूक पार पडली. यामध्ये सुवर्ण पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंनी लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप केलेल्या भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांचे निकटवर्तीय संजय सिंह (Sanjay Singh) यांनी भारतीय कुस्ती महासंघच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे आता ते भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष होणार आहेत. संजय सिंह यांनी प्रतिस्पर्धी अनिता शेओरान यांचा पराभव केला. 

दरम्यान, संजय सिंह हे मूळचे पूर्व उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यातील आहेत. सध्या ते संपूर्ण कुटुंबासह वाराणसीमध्ये राहतात. संजय सिंह यांचे शिक्षण काशी हिंदू विद्यापीठात झाले आहे. संजय सिंह गेल्या दीड दशकाहून अधिक काळ कुस्ती संघटनेशी जोडले गेले असून ते ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या जवळचे मानले जातात. ते 2008 मध्ये पहिल्यांदा वाराणसी कुस्तीगीर संघटनेचे जिल्हाध्यक्ष बनले होते. त्यानंतर 2009 मध्ये यूपीमध्ये कुस्ती संघटना स्थापन झाली, तेव्हा ब्रिजभूषण शरण सिंह प्रदेशाध्यक्ष झाले आणि संजय सिंह यांनी उपाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. 

संजय सिंह यांचे शिक्षण काशी हिंदू विद्यापीठात झाले. संजय सिंह लहानपणापासूनच कुस्तीशी जोडले गेले आहेत. त्यांचे आजोबा कन्हैया सिंह दर महाशिवरात्रीला वाराणसीमध्ये कुस्तीचे मोठे सामने आयोजित करत असत. त्यांच्या कुटुंबात अनेक कुस्तीपटू जन्माला आले, त्यामध्ये मंगला राय यांचाही समावेश आहे. सध्या संजय सिंह हे वाराणसी कुस्ती संघटनेचे अध्यक्ष देखील आहेत. याशिवाय, ते कुस्तीगीर संघटनेच्या राष्ट्रीय सहसचिवपदाची जबाबदारीही पार पाडत आहेत. भारतीय कुस्ती महासंघटनेचे नेतृत्व करण्यासाठी त्यांनी अनेक वेळा परदेशातही भेट दिली आहे. पूर्वांचलच्या महिला कुस्तीपटूंना प्रोत्साहन देण्यात त्यांचा मोठा वाटा असल्याचे समोर येत आहे.

अनिता शेओरान कोण आहेत?
भारतीय कुस्ती महासंघटनेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या अनिता शेओरान या ब्रिजभूषण सिंह यांच्या कट्टर विरोधक मानल्या जातात. अनिता शेओरान यांनी कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधातही साक्ष दिली होती. त्यांनी कुस्ती क्षेत्रात मोठे यश मिळवले असून 2010 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. अनिता शेओरान यांनी निवडणूक जिंकली असती तर भारतीय कुस्ती महासंघटनेचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला कुस्तीपटू ठरल्या असत्या.

संजय कुमार सिंह यांना 40 मते मिळाली
संजय कुमार सिंह यांनी प्रतिस्पर्धी अनिता शेओरान यांचा पराभव केला आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांनी यापूर्वीच दावा केला होता की, संजय सिंह कुस्ती संघटनेचे अध्यक्ष होतील. दरम्यान, भारतीय कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संजय कुमार सिंह यांच्या पॅनलचे बहुतांश उमेदवार विजयी झाले आहेत. निवडणुकीत संजय कुमार सिंह यांना 40 तर, अनिता शेओरान यांना फक्त 7 मते मिळाली. मात्र अनित शेओरान यांच्या पॅनलने सरचिटणीसपदी बाजी मारली आहे. प्रेमचंद लोचब यांनी दर्शन लाल यांचा पराभव केला आहे.

कुस्तीपटूंनी व्यक्त केली नाराजी
ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटू साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांनी संजय कुमार सिंह यांची भारतीय कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केले आहे. आम्ही 40 दिवस रस्त्यावर झोपलो आणि देशाच्या अनेक भागातून बरेच लोक आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आले. ब्रिजभूषण शरण सिंह यांचा व्यावसायिक भागीदार आणि जवळचा सहकारी भारतीय कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदी निवडून आले आहेत. त्यामुळे मी कुस्ती सोडून देईन, असे साक्षी मलिक हिने म्हटले आहे. तर विनेश फोगट म्हणाली की, अपेक्षा खूप कमी आहेत पण आम्हाला न्याय मिळेल अशी आशा आहे. कुस्तीचे भवितव्य अंधारात आहे हे खेदजनक आहे. आपले दु:ख कोणाकडे मांडायचे?

Web Title: Who is Sanjay Singh, new Wrestling Federation of India chief? Birj Bhushan Loyalist Sanjay Singh 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.