ममता सरकारविरोधात उतरले रस्त्यावर! आंदोलनातील 'हे' बाबा कोण?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 12:02 PM2024-08-29T12:02:33+5:302024-08-29T12:07:35+5:30
Balram Bose News: कोलकातामध्ये डॉक्टरची बलात्कार करून हत्या केल्याने पश्चिम बंगालमध्ये हिंसक आंदोलनाची ठिणगी पडली आहे. पोलीस आणि आंदोलकांच्या झटापटीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताहेत. यात भगव्या कपड्यातील एका बाबाचा व्हिडीओने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
Who is Balram Bose: कोलकातामधील आर.जी. कर रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. या घटनेचे देशभरात पडसाद उमटले. पण, पश्चिम बंगालमधील धग अजूनही कमी झालेली नाही. कोलकातासह पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या आंदोलनात एका चेहऱ्याने लक्ष वेधून घेतले. ममता बॅनर्जींच्या सरकारविरोधात सुरू असलेल्या आंदोलनातील हे बाबा कोण, जाणून घ्या.
पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या आंदोलनातील पाच चेहऱ्यांची चर्चा होत आहे. यात एक नाव आहे बाबा बलराम बोस! आंदोलक रस्त्यावर उतरल्यानंतर त्यांच्यावर पाण्याचा मारा करण्यात आला. यावेळी बलराम बोस हे पाण्याचा मारा झेलत तिरंगा फडकवत होते. त्यांचा हाच व्हिडीओ व्हायरल झाला.
कोण आहेत बाबा बलराम बोस?
डॉक्टर महिलेची बलात्कार करून हत्या केल्याच्या विरोधात पश्चिम बंगालमध्ये जनक्षोभ उसळला. नबन्ना आंदोलन उभे राहिले. यात एका व्यक्तीने लक्ष वेधून घेतले, ते आहेत बाबा बलराम बोस!
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला. रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पाण्याचा मारा करण्यात आला. बाबा बलराम बोस हे ही त्या आंदोलकांमध्ये होते. पाण्याचा मारा सुरू होताच आंदोलक पांगले, पण बाबा बलराम बोस हे जागेवरच उभे होते. तिरंगा फडकावत ते घोषणा देत होते.
बाबा बलराम बोस हे संन्यासी आहेत. त्यांच्या पार्श्वभूमीबद्दल निश्चित माहिती नाही. पण, वृत्तांमध्ये बाबा बलराम बोस हे कोलकाताच्या माजी महापौर कमला बोस यांचे नातू असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर ते उच्च शिक्षित असून, स्वेच्छेने त्यांनी संन्यासाचा मार्ग स्वीकारल्याचे म्हटले गेले आहे.
बाबा बलराम बोस आंदोलनाबद्दल काय म्हणाले?
नबन्ना आंदोलनाबद्दल बाबा बलराम बोस म्हणाले की, "या आंदोलनाची हाक विद्यार्थ्यांनी दिलेली होती. प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीने यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले होते. माझ्या घरातही महिला आहेत. त्यांच्या सुरक्षेबद्दल मला चिंता वाटते. समाज सुरक्षित आणि शांत राहिला, तरच महिलांचा सन्मान होईल."
"जिथे महिलांचा आदर केला जात नाही, तिथे देवी-देवता राहत नाहीत. मी जेव्हा या आंदोलनात सहभागी झालो, तेव्हा माझी अशी भूमिका होती की, आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचायला हवा", असे बाबा बलराम म्हणाले.
मी एक सनातनी आहे -बाबा बलराम
"मी एक सनातनी आहे. महादेवाचा भक्त आहे. कोणत्याही राजकीय पक्षाने या आंदोलनाची दिशाभूल करू नये असे मला वाटते. आम्हाला फक्त न्याय हवा आहे, दुसरे काही नको", असे बाबा बलराम बोस म्हणाले.