SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 12:29 PM2024-05-17T12:29:29+5:302024-05-17T12:31:17+5:30
"जर कुणी म्हणत असेल की, हा वेगळा देश आहे, तर हे आक्षेपार्ह आहे. आता या देशाचे कधीही विभाजन होऊ शकणार नाही. काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेता म्हणाला की, उत्तर भारत आणि दक्षिण भारताचे विभाजन करा आणि काँग्रेस पक्ष याला विरोध करत नसेल, या वक्तव्यापासून स्वतःला वेगळे करत नसेल तर, देशातील जनतेने विचार करायला हवा की, काँग्रेस पक्षाचा अजेंडा काय आहे?"
देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आतापर्यंत निवडणुकीचे 4 टप्पे पार पडले आहेत. 20 मे रोजी निवडणुकीच्या 5व्या टप्प्यातील मतदान होईल. यातच, आरक्षणाच्या मुद्द्यावर गृहमंत्री अमित शाह यांनी पुन्हा भाष्य केले आहे. "जोवर भाजपचा एकही खासदार आहे, तोवर या देशात SC, ST आणि OBC आरक्षणाला कुणी हात लावू शकत नाही. पीएम नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा मोठा SC, ST आणि OBC आरक्षणाचा कुणीही समर्थक नाही. हे आम्ही स्पष्ट केले आहे," असे अमित शाह यांनी म्हटले आहे. ते एएनआयसोबत एका मुलाखतीत बोलत होते.
याशिवया, 'उत्तर-दक्षिण भारत विभाजन' या मुद्द्यावर बोलताना शाह म्हणाले, "जर कुणी म्हणत असेल की, हा वेगळा देश आहे, तर हे आक्षेपार्ह आहे. आता या देशाचे कधीही विभाजन होऊ शकणार नाही. काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेता म्हणाला की, उत्तर भारत आणि दक्षिण भारताचे विभाजन करा आणि काँग्रेस पक्ष याला विरोध करत नसेल, या वक्तव्यापासून स्वतःला वेगळे करत नसेल तर, देशातील जनतेने विचार करायला हवा की, काँग्रेस पक्षाचा अजेंडा काय आहे? पणी मी आपल्याला परिणाम सांगतो, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक, ही पाच राज्ये मिळून, या निवडणुकीत एकटा भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत आहे."
यामुलाखतीत, जर 4 जूनला भाजपने 272 चा आकडा पार केला नाही तर? असा प्रश्न विचारला असता, शाह म्हणाले, मला ही शक्यता दिसत नाही. या देशात 60 कोटी लाभार्थींची फौज पंतप्रधान मोदींसोबत उभी आहे. तिची ना कुठली जात आहे, ना कुठला एज ग्रूप, असे शाह यांनी म्हटले आहे.
शाह यांनी आकडेवारीच मांडली -
शाह म्हणाले, आम्ही जवळपास 4 कोटी गरीबांना घरे दिली आहेत. या निवडणुकीनंतर आणखी 3 कोटी देणार आहोत. 32 कोटी आयुष्मान कार्ड दिले आहेत, हा आकडा 60 कोटींवर पोहोचणार आहे. जवळपास 14 कोटी घरांमध्ये नळाने पाणी पोहोचवले आहे. 10 कोटींहून अधिक घरात एलपीजी सिलेंडर दिले आहे. 12 कोटी घरांना शौचालय दिले आहे. ज्यांचे उत्पन्न दिवसाला 500 रुपयेही नव्हते, अशा गरीब 1 कोटी 41 लाख महिलांना लखपती दीदी बनवले आहे. 11 कोटी शेतकऱ्यांना दर वर्षी 6000 रुपये बँक अकाउंटमध्ये दिले जात आहेत. प्रत्येक गरीबाला 5 किलो धान्य मोफत दिले जाते.
शाह यांचा प्लॅन बी काय? -
एएनआयला दिलेल्या या मुलाखतीत, आपण प्लॅन बी तयार करत नाही का? असा प्रश्न केला असता, शाह म्हणाले, जेव्हा प्लॅन-A मध्ये 60 टक्क्यांहून कमी शक्यता असते तेव्हा प्लॅन-B तयार केला जातो. यानंतर, आपल्याला किती शक्यता वाटते? असे विचारले असता शाह म्हणाले, मला निश्चितपणे शंभर टक्के विश्वास आहे की, मोदीजी प्रचंड बहुमतासह विजयी होतील. सर्वांना वाटते की, देश समृद्ध व्हावा, सुरक्षित व्हावा, जगात सन्मान वाढावा. गेल्या दहा वर्षांत जगात देशाचा सन्मान वाढला आहे, हे गरीबातला गरीब आणि श्रीमंत लोकही मान्य करत आहेत.