राष्ट्रपती कोण? आज होणार फैसला, द्रौपदी मुर्मू यांचे पारडे जड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 05:43 AM2022-07-21T05:43:22+5:302022-07-21T05:43:57+5:30
एनडीएचे घटक पक्ष व अन्य प्रादेशिक पक्षांनी दिलेला पाठिंबा लक्षात घेता या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचे पारडे जड असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी होणार आहे. या निवडणुकांसाठी सोमवारी, १८ जुलै रोजी मतदान झाले होते. भाजपप्रणित एनडीएतर्फे द्रौपदी मुर्मू व विरोधी पक्षांच्या वतीने यशवंत सिन्हा हे दोन उमेदवार रिंगणात आहेत. एनडीएचे घटक पक्ष व अन्य प्रादेशिक पक्षांनी दिलेला पाठिंबा लक्षात घेता या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचे पारडे जड असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील ९९ टक्क्यांहून अधिक मतदान झाले हाेते. गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, मिझोराम, पुडुचेरी, सिक्कीम, तामिळनाडूमध्ये या निवडणुकीसाठी १०० टक्के मतदान झाले होते.
संसदेच्या लोकसभा, राज्यसभा या दोन सभागृहांतील खासदार तसेच विविध राज्ये व काही केंद्रशासित प्रदेशांतील विधानसभेतील आमदार यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीकरता देशभरात जे मतदान झाले, त्याची मतमोजणी गुरुवारी संसद भवनात करण्यात येणार आहे व निकालही त्याच दिवशी जाहीर होणे अपेक्षित आहे.