म्हशीचा खरा मालक कोण?; सत्य जाणून घेण्यासाठी पोलीस करणार DNA चाचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2022 10:13 PM2022-06-05T22:13:09+5:302022-06-05T22:14:55+5:30
सध्या एसपी शामली सुकिर्ती माधव यांनी म्हशीच्या मालकाचा शोध घेण्यासाठी DNA चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे
शामली - उत्तर प्रदेशातील शामली इथं म्हशीचा खरा मालक कोण यासाठी DNA चाचणी करण्यात येणार आहे. या म्हशीचा मालक कोण हे शोधणं पोलिसांसाठी कठीण झालं आहे. ज्यामुळे जिल्ह्याचे एसपी सुकिर्ती माधव यांनी म्हशीची DNA चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. २ वर्षापूर्वी चोरी झालेल्या म्हशीच्या खऱ्या मालकाचा शोध घेण्यासाठी तिला जन्म देणाऱ्या म्हैशीचं डिएनए सॅम्पल घेतलं आहे. आता हा नमुना राज्याबाहेरील प्रयोगशाळेत पाठवला जाणार आहे.
अहमदगडच्या गावात राहणाऱ्या चंद्रपाल कश्यप यांच्या घरातून २५ ऑगस्ट २०२० रोजी कुणीतरी म्हैस चोरी केली होती. खूप शोधल्यानंतर नोव्हेंबर २०२० मध्ये सहारनपूरच्या बीनपूर गावात सतबीर सिंह यांच्या घरी ती म्हैस सापडल्याचा दावा चंद्रपाल यांनी केला. मात्र सतबीर सिंहने ती म्हैस आपलीच असल्याचं म्हटलं. त्यानंतर कोविडमुळे कायदेशीर प्रक्रियेला विलंब झाला.
सध्या एसपी शामली सुकिर्ती माधव यांनी म्हशीच्या मालकाचा शोध घेण्यासाठी DNA चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण तक्रारदार चंद्रपाल याच्या दाव्यानुसार, ती म्हैस आजही त्याच्याजवळ आहे जिने चोरी झालेल्या म्हशीला जन्म दिला होता. तक्रारदार चंद्रपाल कश्यप म्हणाला की, माणसांप्रमाणे जनावारांमध्येही विविध वैशिष्टं असतात. चोरी झालेल्या म्हशीच्या डाव्या पायावर एक खूण आणि शेपटीचा शेवटचा भाग सफेद होता. प्राण्यांची स्मरणशक्तीही चांगली असते. जेव्हा मी म्हशीकडे गेलो तेव्हा तिला मला लगेच ओळखलं असं त्याने सांगितले.
त्याचसोबत डीएनए चाचणीनंतर हे स्पष्ट होईल की ती म्हैस माझीच आहे असं त्याने सांगितले. तर एसपी सुकिर्ती माधव यांच्या आदेशानंतर पोलिसांसह पशु डॉक्टरांची टीम अहमदगड आणि बीनपूर गावात पोहचली. याठिकाणी दोन्ही म्हशीचा डिएनए नमुना त्यांनी ताब्यात घेतले. या म्हशीचा खरा मालक कोण हे या डिएनए चाचणीनंतर समोर येईल. तक्रारदाराचा दावा आहे चोरी झालेल्या म्हशीची आई त्याच्याकडे आहे. त्यामुळे डिएनए चाचणीनंतर सगळं सत्य बाहेर येईल असं पोलीस म्हणाले. परंतु या घटनेची चर्चीा जिल्ह्यात सर्वत्र पसरली आहे.