Karnataka Hijab controversy: कोण आहे हिजाब घातलेली ती तरुणी? जिला घेरून करण्यात आली घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 08:24 AM2022-02-09T08:24:33+5:302022-02-09T09:05:08+5:30
Karnataka Hijab controversy: कॉलेजमध्ये हिजाब घालून आलेल्या एका तरुणीसमोर घोषणा दिल्या जातात. तेव्हा ही तरुणीनेही प्रत्युत्तरदाखल घोषणा दिल्या. या तरुणीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना कर्नाटकच्या मांड्या येथे घडली आहे.
नवी दिल्ली - कर्नाटकमधील एका कॉलेजमधील एक व्हिडीओ समोर आला आहे. जिथे मुस्कान नावाची एक तरुणी हिजाब घालून कॉलेजमध्ये येते. तेव्हा तिथे असलेला जमाव या तरुणीच्या दिशेने येतो. त्यानंतर या तरुणीच्या समोर घोषणा दिल्या जातात. तेव्हा ही तरुणीही प्रत्युत्तरदाखल घोषणा देताना दिसते. या तरुणीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना कर्नाटकच्या मांड्या येथे घडली आहे.
या तरुणीचं नाव मुस्कान आहे. तिने सांगितले की, मी कॉलेजमध्ये असाइनमेंटसाठी आले होते. तिथे असलेला तरुणांचा गट मला जाऊ देत नव्हता. कारण मी बुरखा परिधान केला होता. ते मला बुरखा हटवून आत जाण्यास सांगत होते. जेव्हा मी गेले तेव्हा त्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. यामधील अनेकजण हे कॉलेजमधील होते. तर काहीजण बाहेरून आलेले होते.
त्यांनी जेव्हा घोषणाबाजी केली. तेव्हा प्रत्युत्तरदाखल मीसुद्धा घोषणा दिल्या. माझे शिक्षक आणि प्राचार्यांनी मला पाठिंबा दिला. त्यांनी मला तिथून सुरक्षितपणे नेले. या गर्दीतील तरुण सांगत होते की, जर तिने बुरखा हटवला नाही तर तेसुद्धा भगवी शाल हटवणार नाही. त्यांच्याकडून सातत्याने मला घेरण्याचा प्रयत्न करण्यात येत होता.
दरम्यान, याबाबत कर्नाटकचे शिक्षणमंत्री बीसी नागेश यांनी सांगितले की, काही लोकांकडून जाणीवपूर्वक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांना वाटते की, विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शाळेत गणवेशामध्येच आले पाहिजे. त्या प्रकरणामध्ये राजकारणाशी संबंधित काही लोकांचा सहभाग आहे.
सध्या कर्नाटकमधील अनेक शाळा आणि कॉलेजमध्ये हिजाब, बुरख्यावरून वाद सुरू आहे. एकीकडे मुस्लिम विद्यार्थिनी शाळा-कॉलेजमध्ये हिजाब परिधान करून आपला विरोध नोंदवत आहेत. तर विद्यार्थी भगवे स्कार्फ घालून आपला विरोध नोंदवत आहेत. हे प्रकरण कोर्टात पोहोचले आहे. कर्नाटक सरकारने राज्यात कर्नाटका एज्युकेशन अॅक्ट-१९८३ चे कलम १३३ लागू केले आहे. त्यानुसार कर्नाटकातील शाळांमध्ये गणवेश अनिवार्य करण्यात आला आहे. तेव्हापासूनच या वादाला तोंड फुटले आहे.