कोण आहेत व्हीके पांडियन? ज्यांना मिळाला कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 03:25 PM2023-10-24T15:25:26+5:302023-10-24T15:26:39+5:30
मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे अत्यंत जवळचे सहकारी मानले जाणारे व्हीके पांडियन अनेकदा वादात सापडले आहेत.
नवी दिल्ली : पुढील वर्षी ओडिशामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठे बदल आधीच दिसून येत आहेत. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे विश्वासू खाजगी सचिव आणि राज्याचे ५ टी सचिव व्हीके पांडियन यांना कॅबिनेट दर्जा देण्यात आला आहे. २०२४ च्या महत्त्वाच्या निवडणुकांपूर्वी व्हीके पांडियन यांच्या वारंवार सार्वजनिक उपस्थितीवरून विरोधकांकडून वाढत असलेल्या टीकेच्या दरम्यान त्यांनी व्हीआरएस (स्वैच्छिक सेवानिवृत्ती) ची निवड केली होती.
विशेष म्हणजे त्यांना एक दिवस आधी व्हीआरएस मिळाला होता. दरम्यान, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे अत्यंत जवळचे सहकारी मानले जाणारे व्हीके पांडियन अनेकदा वादात सापडले आहेत. व्हीके पांडियन यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून राजकीय फायदा मिळवल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. व्हीके पांडियन हे ओडिशा केडरचे २००० बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
राज्याचे सामान्य प्रशासन आणि सार्वजनिक तक्रार विभागाने २४ ऑक्टोबरच्या आदेशात नमूद केले आहे की, व्हीके पांडियन यांना ५ टी (परिवर्तनात्मक उपक्रम) आणि न्यू ओडिशा योजनेचे अध्यक्ष म्हणून 'कॅबिनेट मंत्री पदावर' नियुक्त करण्यात आले आहे. व्हीके पांडियन थेट मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या अंतर्गत काम करतील, असे आदेशात म्हटले आहे. तसेच, कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने ओडिशा सरकारच्या संदर्भ पत्रानंतर २३ ऑक्टोबर रोजी व्हीके पांडियन यांच्या स्वेच्छानिवृत्तीला मान्यता दिली आहे.
व्हीके पांडियन हे तामिळनाडूचे रहिवासी
२००० बॅचचे आयएएस अधिकारी व्हीके पांडियन हे मुळचे तामिळनाडू येथील आहेत. एक तरुण जिल्हाधिकारी म्हणून व्हीके पांडियन यांनी आपली ओळख निर्माण केली होती. १९९९ मध्ये ओडिशा सुपर चक्रीवादळानंतर गंजाम जिल्ह्यात अनेकांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर २०११ मध्ये मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी व्हीके पांडियन यांना मुख्यमंत्री कार्यालयात आणले होते. नवीन पटनायक यांचे एकेकाळचे विश्वासू सहकारी आणि माजी आयएएस अधिकारी प्यारी मोहन मोहपात्रा यांनी रिकामी केलेली पोकळी हळूहळू व्हीके पांडियन यांनी भरून काढण्यास सुरुवात केली.